तुम्ही मर्यादा ओलांडताय...'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर 'भाडिपा' नेटकऱ्यांच्या रडारवर, व्हायरल व्हिडिओंंमुळे संताप, कारवाईची मागणी

'वातावरण तापल्यामुळे' शो पुढे ढकलल्याचे 'भाडिपा'ने केले जाहीर; दरम्यान, शोवर कारवाई करावी यासाठीची तक्रार माहिती व प्रसारण मंत्रालयासह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सोशल मीडियावर टॅग करुन करण्यात आली आहे.
तुम्ही मर्यादा ओलांडताय...'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर 'भाडिपा' नेटकऱ्यांच्या रडारवर, व्हायरल व्हिडिओंंमुळे संताप, कारवाईची मागणी
Published on

युट्यूबर समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो अश्लील कंटेंटमुळे वादात असतानाच आता एका प्रसिद्ध मराठी युट्यूब चॅनलच्या कार्यक्रमांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. 'भाडिपा' हे युट्यूब चॅनल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहे. या चॅनलवरील नवीन शो ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’बाबत नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या शोवर कारवाई करावी यासाठीची तक्रार देखील माहिती व प्रसारण मंत्रालयासह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सोशल मीडियावर टॅग करुन करण्यात आली आहे.

'भाडिपा' या युट्यूब चॅनलने अलीकडेच ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा नवीन शो आणला. डबल मिनिंग, अश्लील आणि दर्जाहिन भाषेचा वापर करुन विनोद निर्मिती या कार्यक्रमात होते आणि कहर म्हणजे हा कार्यक्रम तिकीट लावून रंगमंचावर सादर होतो. या कार्यक्रमाच्या काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून अश्लील कंटेंटमुळे नेटकरी रोष व्यक्त करीत आहेत. भाडिपा चॅनलचा सर्वेसर्वा सारंग साठेलाही ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर तक्रार

सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने माहिती व प्रसारण मंत्रालयासह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करुन शोवर कारवाई करावी आणि तातडीने या शोसंबंधित सर्व सामग्री सोशल मीडियावरुन हटवण्याचीही मागणी केली आहे.

'वातावरण तापल्यामुळे' शो पुढे ढकलला

दरम्यान, नेटकऱ्यांचा वाढता रोष बघता भाडिपाने ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ चा १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाइन्स डेला होणारा शो पुढे ढकलला आहे. 'वातावरण तापल्यामुळे' शो पुढे ढकलत असल्याचे भाडिपाने एका पोस्टद्वारे सांगितले आहे. तर, 'तुम्ही मर्यादा ओलांडताय, अजूनही वेळ आहे...सुधरा' असे सल्लेही काही नेटकरी भाडिपाला देत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in