'OMG 2' च्या दिग्दर्शकांचा मोठा निर्णय ; लवकरच सिनेमाचं अनकट व्हर्जन ओटीटीवर पाहता येणार

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'ए प्रमाणपत्र' देत या चित्रपटातील २० दृश्यांवर कात्री लावली होती.
'OMG 2' च्या दिग्दर्शकांचा मोठा निर्णय ; लवकरच सिनेमाचं अनकट व्हर्जन ओटीटीवर पाहता येणार

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराच्या दूताची भूमिका केली आहे. यावरुन बराच वादही झाला. पण आता या चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

'ओह माय गॉड २' हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. सेन्सॉर बोर्डाने देखील या चित्रपटाला 'ए प्रमाणपत्र' देत या चित्रपटामधील २० दृश्यांवर कात्री लावली होती. पण या चित्रपटाचं अनकट व्हर्जन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय यांनी एका मुलाखती याबाबतची माहिती दिली आहे. राय म्हणाले की, "हा चित्रपट सर्वांनी पहावा अशी आमची इच्छा होती. परंतु सेन्सॉर बोर्डाने 'ए सर्टिफिकेट' दिल्याने आमची ही इच्छा अपुर्ण राहिली. या निर्णयामुळे आम्हाला खूप दुःख झालं. आम्ही त्यांना(सेन्सॉर बोर्डाला) 'युएस सर्टिफिकेट' देण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही. पण या चित्रपटाचं 'अनकट व्हर्जन' आम्ही ओटीटीवर प्रदर्शित करण्याचं आम्ही ठरवलं आहे."

हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेते पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये चांगली कामगिरी करत असून या दहा दिवसात या सिनेमाने शंभरहून अधिक कोटींचा गल्ला जमावाला आहे .

logo
marathi.freepressjournal.in