
बिग बॉस १६चा फिनाले रविवारी पार पडला. यंदा शिव ठाकरे, एमसी स्टॅन, आणि प्रियंका चाहर चौधरी यांच्यामध्ये तगडी लढत झाली. शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी या सीजनचे विजेता होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच पुण्यात राहणारा आणि गरीब परिस्थितीवर मात करत रॅपर म्हणून नाव कमावणाऱ्या एमसी स्टॅनने बाजी मारली. तो बिग बॉस १६चा विजेता ठरला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्याच्या विजयाने शिव ठाकरेही आनंद व्यक्त केला. उपविजेत्या ठरलेल्या शिव ठाकरेने प्रतिक्रिया देताना म्हंटले की, "मी एक चांगला खेळाडू आहे, पण एमसी स्टॅन हा खरा माणूस आहे."
शिव ठाकरेने बाहेर माध्यमांनाही संवाद साधताना म्हणाला की, "साहजिकच मला जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप मेहनतीने खेळ खेळलो आणि नेहमीच चांगली कामगिरी केली. एखाद्या मुद्यासाठी आवाज उठवणे असो किंवा कोणत्याही कामात माझे सर्वोत्तम देणे असो, मी माझे १०० टक्के दिले. किमान हिंदी प्रेक्षक मला ओळखत आहेत यातच मी आनंदी आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
एमसी स्टॅनने विजयाबद्दल सांगताना म्हणाला की, "सुरुवातील बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मला घरातून पळून जावेसे वाटत होते. मला समजताच नव्हते की नक्की मला काय होता आहे ते. आपण अनेकदा चुकीचे शब्द वापरले की सलमान खान आपल्याला समजवायचा, चांगले बोल सांगायचा ते मी शक्य होईल तिथे मी पाळले. पण काही लोक वागायचेच असे की बोलावेच लागायचे." असे म्हणत तो अनेकदा भावुक झाला. त्याने आपल्या विजयासाठी चाहत्यांचे मनापासून आभार मानले.