BB Marathi : 'आगाऊ कार्टी...जान्हवीला सोडू नका...' मेघा धाडे जान्हवीवर संतापली, रितेश देशमुखलाही केली विनंती

बिग बॉस मराठी सिजन १ ची विजेती मेघा धाडे हिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून जान्हवीला खडेबोल सुनावत होस्ट रितेश देशमुख यांना विनंती केली आहे.
Megha Dhade On Janhavi Killekar
मेघा धाडे जान्हवीवर संतापली
Published on

मुंबई : बिग बॉस मराठी ५ हा सीजन सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. नव्या सिजनला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले असताना या सिजनने टीआरपीचे सर्व रेकॉर्डस् मोडले. बिगबॉस मराठीच्या घरात पहिल्या आठवड्यापासून वादविवाद, भांडण पाहायला मिळतायत. मागच्याच आठवड्यात शो चा होस्ट रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर घरातील अनेक सदस्यांची शाळा घेतली. दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात गेलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हि तिच्या वागण्यावरून सध्या प्रेक्षकांचा रोष ओढावून घेताना दिसतेय. तर शुक्रवारच्या भागात तिने जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल चुकीचे शब्द वापरल्याने सोशल मीडियावर नेटकरी तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकार तिच्यावर टीका करत आहेत. अशातच बिग बॉस मराठी सिजन १ ची विजेती मेघा धाडे हिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून जान्हवीला खडेबोल सुनावत होस्ट रितेश देशमुख यांना विनंती केली आहे.

शुक्रवारच्या भागात दाखवल्यानुसार घरातील दोन ग्रुप गार्डनमध्ये बसलेले असतात. यावेळी जान्हवी आर्या जाधव हिला 'निर्लज्य' असं म्हणते. हे ऐकून वर्षा उसगांवकर या जान्हवीला 'निर्लज्जम समर्पयामि' असं म्हणतात. यावर जान्हवी चिडते आणि म्हणते, 'ताई मी सुरुवातीपासून तुमचा आदर केलेला आहे. पण माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ऍक्टिंग तुमच्याकडेच ठेवा'.

जान्हवीने बिग बॉसच्या घरात पातळी सोडून वर्षा उसगांवकर यांच्यावर टीका केल्याने अभिनेत्री मेघा धाडेने सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त केला. मेघा पोस्ट शेअर करत म्हणाली, "माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आली तर तिला सोडू नका, तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. हे कळकळीचं Vote Out अपील आहे माझं." पुढे मेघा म्हणाली, "मला आठवतंय बिग बॉस हिंदीमध्ये सलमान खान यांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओमला अशाच वागणुकीमुळे घराबाहेर केलं होतं. आम्हाला अशीच ऍक्शन जान्हवी किल्लेकर हिच्या बाबतीत सुद्धा घेतली जावी अशी अपेक्षा आहे. रितेश सर कृपया तिला बाहेर काढा, आम्हाला तिला या घरात पाहायचे नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे".

भांडणादरम्यान जान्हवीने वर्षा यांना म्हंटले होते की, "ही फालतूची ऍक्टिंग माझ्या समोर करू नका. तुम्हाला ज्यांनी अभिनयासाठी पुरस्कार दिला त्यांना आता पश्चाताप होत असेल की आपण यांना पुरस्कार का दिला? बाहेर अनेक चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत. पण तुम्हाला दिलाय". जान्हवीने वर्षा उसगांवकर यांच्या सारख्या नामांकित मराठी कलाकाराबाबत असे उद्गार काढल्याने मेघा धाडे चांगलीच संतापल्याचे पाहायला मिळाले.

मेघाने पोस्ट करत म्हंटले की, "महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कार ह्यावर या पद्धतीच्या भाषेचा वापर झालेला आहे, त्याबाबत आज मान शरमेने खाली गेली. वर्षा ताई कलर्स मराठीने फक्त अपमानित होण्यासाठी तुम्हाला या शो मध्ये आणले आहे असे वाटतं. हेच पुरस्कार मिळण्यासाठी कित्येकांची हयात जाते. जेष्ठ कलाकार सचिन पिळगावकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, सयाजी शिंदे, महेश कोठारे, प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केलेली नाराजी मनाला अजून चटका देणारी आहे. प्रशांत दामले आणि मोहन जोशी सर आपल्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगून गेले".

मेघा धाडेने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत असून बिग बॉस स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिच्या बाबत नेटकरी राग व्यक्त करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in