Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात झालं पहिलं एलिमिनेशन; 'राम कृष्ण हरी' म्हणत कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घेतली एक्झिट!
Bigg Boss Marathi New Season: 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पुरुषोत्तमदादा एक वेगळा फ्लेवर घेऊन आले. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास संपला. 'राम कृष्ण हरी' म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरातून एक्झिट घेतली.
कीर्तनकार म्हटलं की एक ठरावीक इमेज आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. पण पुरुषोत्तमदादा पाटील मात्र वेगळे आहेत. ते मॉडर्न, टेक्नोसेव्ही आणि कलात्मक आहेत. कीर्तनात नावीन्य आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण 'बिग बॉस'च्या चक्रव्यूहात मात्र ते चांगलेच अडकले. कल्ला करण्यासोबत शब्दांचा हल्ला करण्यात ते कमी पडले.
'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले,"बिग बॉस मराठीचा एक वेगळा अनुभव घेऊन आलोय. माझं काही चुकलं असल्याचं मला वाटत नाही. घरामधला वावर कसा करायचा हे समजता समजता बाहेर आलोय. 'बिग बॉस मराठी'चा अनुभव थरारक आहे. स्वत:शी ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं हे घर फार महत्त्वाचं आहे".
पुरुषोत्तमदादा पुढे म्हणाले,"बिग बॉस मराठी'च्या घरात एखाद्या गोष्टीला प्रतिकार करायला मला जमलं नाही. तरी जिथे नडता आलं तिथे नडलो. यापुढे घरातील इतर सदस्य मित्रांमध्ये मी मला पाहील. 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन अभिजीत सावंत जिंकू शकतो. तर सूरज चव्हाण या सीझनमधील वीक खेळाडू आहे".
पुरुषोत्तमदादा पाटील पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडल्याने सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. माऊलींची अध्यात्माची बैठक असल्याने घरातील सदस्यांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. पुरुषोत्तमदादा बाहेर पडल्याने घरात आता १५ सदस्य उरले आहेत. पहिल्या 'भाऊच्या धक्क्या'नंतर आता हे १५ सदस्य जोमात खेळताना दिसून येतील.