

महाराष्ट्राचं तुफान अखेर उद्यापासून थेट प्रेक्षकांच्या घराघरात धडक देणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ उद्या भव्य ग्रँड प्रीमियरसह सुरू होत आहे. नवा सीझन, नवे चेहरे, नवे डावपेच आणि भरपूर मनोरंजन असा दमदार प्रवास यंदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्येही पुन्हा एकदा सूत्रसंचालकपदाची धुरा सांभाळणारे लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख आपल्या खास स्टाइलमध्ये विनोद, खेळकर टोमणे आणि गरज पडल्यास कडक भूमिका घेत योग्य दिशा देणार आहेत. त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्समुळे ग्रँड प्रीमियरला एनर्जी आणि ग्लॅमरची खास झलक पाहायला मिळणार आहे.
सहभागींच्या प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला
ग्रँड प्रीमियरपूर्वी प्रदर्शित झालेल्या सहभागींच्या ‘अनरिव्हील’ प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. कुणी सौंदर्य आणि अदा घेऊन येणारं दमदार रूप, कुणी कातिल डान्स मूव्ह्जने घायाळ करणारी एन्ट्री, तर कुणी घरात धुमाकूळ घालणारी व्यक्तिमत्त्वं - या प्रोमोंमुळे सोशल मीडियावर "हे सहभागी नेमके कोण?" असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.
दार उघडणार, नवा खेळ सुरू होणार
उद्या अखेर बिग बॉसच्या घराचं दार उघडणार असून यंदा कोण-कोण सहभागी घरात प्रवेश करणार, हे स्पष्ट होणार आहे. नशिबाचा खेळ, रणनीतींची सुरुवात, संघर्ष, मैत्री, वाद आणि तुफान मनोरंजनाचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ६, ११ जानेवारीपासून रात्री ८ वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstarवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.