बॉलीवूडचा राजबिंडा ‘ही-मॅन’ कालवश! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शोलेतील ‘वीरू’, बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, ‘हँडसम हंक’ धर्मेंद्र यांचे सोमवारी दुपारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बॉलीवूडचा राजबिंडा ‘ही-मॅन’ कालवश!
बॉलीवूडचा राजबिंडा ‘ही-मॅन’ कालवश!
Published on

मुंबई : शोलेतील ‘वीरू’, बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, ‘हँडसम हंक’ धर्मेंद्र यांचे सोमवारी दुपारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण देओल कुटुंबीय आणि बॉलीवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थित होती. धर्मेंद्र यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

धर्मेंद्र काही काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. १० नोव्हेंबरला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १२ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. पण, अखेर सोमवारी जुहूतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांत धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या मृत्यूच्या अनेकदा अफवाही पसरल्या होत्या.

दुपारी १:१० वाजता धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली. धर्मेंद्र यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून विलेपार्ले स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी विलेपार्ले स्मशानभूमीतील सुरक्षा वाढवण्यात आली. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सलमान खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केला शोक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. धर्मेंद्र यांच्या रुपाने सिनेसृष्टीने एक अतिशय देखणा, सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा असणारा, पण त्यात कुठेही दांडगाई नसणारा हिरो गमावला, अशी भावना या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

धर्मेंद्र यांनी मराठी सिनेमातही केले काम

धर्मेंद्र यांनी एका मराठी सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली. मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीखातर धर्मेंद्रनी हेमंत कदम यांच्या ‘हीच काय चुकलं’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी शूटिंग केले. ‘घेऊन टांगा सर्जा निघाला... दूर धन्याचा गाव... अरे तू धाव’ असे त्या गाण्याचे बोल होते. या गाण्यात धर्मेंद्रव्यतिरिक्त दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचादेखील सहभाग होता. हा सिनेमा १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमांमध्ये रंजना आणि विजय कदम यांच्यासुद्धा भूमिका होत्या.

धर्मेंद्र यांचे गाजलेले चित्रपट

धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘प्रतिज्ञा’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’, ‘धरम वीर’, ‘अनुपमा’, ‘मेरा गाँव मेरा देश’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यासारख्या जवळपास २५० चित्रपटांतून अभिनय केला. धर्मेंद्र यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहिल्या आहेत. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी ‘शोले’मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंगाचा आजही राजकीय क्षेत्रातील काही कार्यकर्त्यांकडून आंदोलन म्हणून वापर केला जातो.

प्रेरणादायी वारसा - राष्ट्रपती मुर्मू

‘धर्मेंद्र हे भारतीय सिनेमातील एक ‘आगळे व्यक्तिमत्त्व’ होते. त्यांच्या निधनाने भारतीय सिनेमासृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. तरुण कलाकारांसाठी त्यांनी प्रेरणादायी वारसा सोडला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रपती मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे.

एका युगाचा अंत - मोदी

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले, “धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिकांतील विविधता असंख्य लोकांच्या हृदयाला भिडली. धर्मेंद्र यांची साधी, विनम्र आणि प्रेमळ स्वभाववैशिष्ट्ये त्यांना तितकीच प्रिय बनवत होती.”

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दोन्ही सभागृहांतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही श्रद्धांजली व्यक्त केली.

एक अनमोल तारा गमावला - खर्गे

आज भारतीय चित्रपटसृष्टीने एक अनमोल तारा गमावला आहे. पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांनी दशकानुदशके सिनेप्रेमींच्या हृदयावर राज्य केले आणि त्यांच्या अद्वितीय अभिनयाने व साध्या जीवनशैलीने अजरामर छाप पाडली आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी श्रद्धांजली वाहिली.

कधीही भरून निघणार नाही अशी हानी - राहुल गांधी

धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय कला जगताची कधीही भरून निघणार नाही अशी हानी झाली आहे. त्यांचे जवळपास सात दशकांचे अद्वितीय योगदान सदैव आदराने व प्रेमाने स्मरणात राहील. धर्मेंद्रजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

‘विजयता फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊसची उभारणी

धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी ‘विजयता फिल्म्स’ हे त्यांचे प्रॉडक्शन हाऊस १९८१ मध्ये सुरू केले. ‘विजयता फिल्म्स’च्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलीवूडमध्ये आणले. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली. याच प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.

सर्वसामान्य कुटुंबातून ‘ही-मॅन’पर्यंतचा प्रवास

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. त्यांचे खरे नाव केवल कृष्ण देओल होते. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र या नावाने लढ झाली. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झाला होता. धर्मेंद्र यांचे वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो हे आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य सहनेवाल गावात घालवले आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.

logo
marathi.freepressjournal.in