
मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या किनारा बंगल्यात घरफोडीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगल्यातून काहीच वस्तू चोरीस गेला नाही. याप्रकरणी जुहू पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केला आहे.
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या कुटुंबीयांसोबत जुहू येथील सुपर साऊंड स्टुडिओजवळील गांधीग्राम रोडवरील किनारा बंगल्यात राहते. मे महिन्यांत तिच्या बंगल्यात सजावट आणि दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे ती तिच्या कुटुंबीयांसोबत विदेशात गेली होती. ६ जूनला तिच्याकडील एक कर्मचारी शेखर इसराज चौधरी हा शिल्पाच्या मुलीच्या बेडरुममध्ये गेला होता. यावेळी त्याला तिच्या रुममधील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
कपाटाचे दरवाजे उघडे होते. बेडरुमच्या स्लायडिंगची खिडकी उघडी होती. तसेच गॅलरीमधील पक्षांसाठी लावलेली नायलॉनची जाळी कापलेली दिसली. स्कायडिंग खिडकीतूनच एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन घरफोडीचा प्रयत्न केला होता.