‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या कलाकारांसोबत दिलखुलास संवाद ; 'नवशक्ती'च्या ऑफिसमध्ये रंगल्या गप्पा

विजय पाटकरांच्या या चित्रपटात पॅडीच्या अभिनयानं सजलेला युवराज पहायला मिळणार आहे आणि या युवराजचेच हे लग्न असून 'परी' म्हणजेच आपल्या सर्वांना हसविणाऱ्या 'हेमांगी कवी' सोबत त्याची केमिस्ट्री जमली आहे
‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या कलाकारांसोबत दिलखुलास संवाद ; 'नवशक्ती'च्या ऑफिसमध्ये रंगल्या गप्पा

प्रसिद्ध विनोदी अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर, पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे, जयवंत वाडकर आणि आनंदा कारेकर यांनी खास दै. नवशक्तिच्या कार्यालयाला त्यांच्या नव्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त भेट दिली. या चित्रपटाच्या निर्मितीचा रंजक प्रवास त्यांनी यानिमित्त मान्यवरांसोबत बोलताना कथन केला. मकरंद अनासपुरे यांसोबतच या चित्रपटात २१ मुरब्बी कलावंताच्या भूमिका असून अभिनेत्री रिमा लागू यांचा हा नायिका म्हणून अखेरचा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना यानिमित्त उजाळा देताना हे चारही हास्यसम्राट भावूक झाले होते. येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

यावेळी या कलावंतांनी कार्यालयात मनमोकळा संवाद साधला. आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसवणाऱ्या विजय पाटकर यांनी त्यांच्या नव्या 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटातही रसिकप्रेक्षकांना पोटधरून हसविण्याचेच काम केले आहे. विजय पाटकरांच्या या चित्रपटात पॅडीच्या अभिनयानं सजलेला युवराज पहायला मिळणार आहे आणि या युवराजचेच हे लग्न असून 'परी' म्हणजेच आपल्या सर्वांना हसविणाऱ्या 'हेमांगी कवी' सोबत त्याची केमिस्ट्री जमली आहे. विजय पाटकर यांनी शूटींगवेळचे काही किस्से सांगितले. दरम्यान, यावेळी विनोदी वातावरण निर्माण झाले होते. तगड्या आणि मोठ्या संख्येने कलाकारांना जुळवून घेताना आलेले अनुभव विजय पाटकर यांनी कथन केले.

'वऱ्हाडी वाजंत्री' हा चित्रपट म्हणजे फुल टू धमाल असून याबाबत जयवंत वाडकर म्हणाले की, वैभव परबने अतिशय सुरेख लेखन केल्यामुळे आणि विजय पाटकरने अनोख्या शैलीत दिग्दर्शन केल्यानं 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये काम करताना खूप धमाल आली. दैनंदिन जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे या चित्रपटात निखळ विनोदनिर्मिती केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे एखाद्या कॅरीकॅचरसारखे आहे. विजयने सर्व कॅरेक्टर्स एकाच फ्रेममध्ये सादर केली आहेत. रिमा आणि मोहन जोशी यांनी एका गाण्यात अफलातून परफॅार्म केलं आहे. पॅडी कांबळे आणि हेमांगी कवीचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पहायला हवा, अशी इच्छाही जयवंत वाडकर यांनी व्यक्त केली.

'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रिमा लागू, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

मराठी सिनेमाला आधीच प्रेक्षक कमी - वाडकर

हर हर महादेव सिनेमा संदर्भात चालू असलेल्या वादविवादाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्याबद्दल वाडकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, आधीच मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळताना कठीण असतानाच अशाप्रकारच्या घटना जर घडल्या तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. तुमच्याकडे निषेध व्यक्त करण्यासाठी अन्य पर्यायदेखील आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in