फक्त 13 मिनिटे आला अन् प्रेक्षकांची मनं जिंकून गेला, उपेंद्र लिमयेने सांगितला मराठी डायलॉग्सचा 'तो' किस्सा

एखाद्या विषयाचा चित्रपट यशस्वी ठरला म्हणून रामू त्याच त्याच विषयावर चित्रपट बनवत नाही, तो वेगवेगळे विषयांवर प्रयोग करत असतो. म्हणून मला तो फार आवडतो.
फक्त 13 मिनिटे आला अन् प्रेक्षकांची मनं जिंकून गेला, उपेंद्र लिमयेने सांगितला मराठी डायलॉग्सचा 'तो' किस्सा
PM
Published on

"संदीप रेड्डी वांगा हा तर आजचा राम गोपाल वर्मा आहे..."असे कौतुकास्पद उद्गार मराठामोळा अभिनेता उपेंद्र लिमये याने दिग्दर्शक संदीप रेड्डी यांच्यासाठी काढले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात उपेंद्रने फ्रेडीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातला अनुभव त्यांनी 'नवशक्ती'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितला.

"आधी मी या चित्रपटासाठी नाही म्हणून कळवले होते. मी विचार केला की कुठे एका सीनसाठी जावू. पण नंतर मला संदीप रेड्डी वांगा हा चित्रपट बनवत असल्याचे समजले. त्यामुळे मी गेलो. कारण, मला त्यांचा अर्जुन रेड्डी हा चित्रपट खूप आवडला होता. अर्जुन रेड्डी चित्रपट पहिला तेव्हा मला हा तर आजचा राम गोपाल वर्मा असल्याचे वाटले. कारण, रामूच्या दिग्दर्शनचा मी चाहता आहे. ज्या प्रकारचे तो सुरूवातील चित्रपट बनवायचा ते खुपच छान होते आणि त्यांच्यासोबत मी कामपण केले आहे. एखाद्या विषयाचा चित्रपट यशस्वी ठरला म्हणून रामू त्याच त्याच विषयावर चित्रपट बनवत नाही, तो वेगवेगळे विषयांवर प्रयोग करत असतो. म्हणून मला तो फार आवडतो.

मराठी डायलॉग कसे आले?

अॅनिमल चित्रपटात अवघ्या 13 मिनिटांसाठी उपेंदची एंट्री होती. पण त्या दरम्यानच्या त्याच्या मराठी डायलॉग्सने प्रेक्षकांची मनं जिंकली. फक्त 13 मिनिटांसाठी आला, पण मन जिंकून गेला, अशीच काहीशी प्रतिक्रिया चित्रपटानंतर प्रेक्षक देत होते. त्याबाबत बोलताना, मराठी डायलॉग्स मी स्वतःच लिहिल्याचेही उपेंद्रने सांगितले. उपेंद्र म्हणाला, "संदीपने चित्रपटाचा संपूर्ण सीन सांगितला आणि चित्रपटात एक भारदस्त भूमिका हवी आहे, व त्यासाठी योग्य डायलॉग्स हवे आहेत. त्यानंतर मीच त्यासाठी डायलॉग्स लिहिले. सिनेमात जे काही मराठी डायलॉग्स आहेत ते मी स्वतः लिहिले होते. संदीपने त्यात थोडाफार बदल केला. चित्रपटात जो रागात मी आवाज काढला आहे. तो पण असा रँडम काढला होता. तो आवाज मी विचार करून काढला नव्हता."

बॉलिवूडमध्ये रणबीरसारखा कलाकार बघितला नाही -

रणबीर कपूर विषयी बोलताना उपेंद्र म्हणाले की, "मी अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. पण रणबीर कपूर सारखा कलाकार मी बघितला नाही. त्याला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही. त्याच्या वागण्या बोलण्यात खूप साधेपणा असतो आणि तसाही मला रणबीर हा 'रॉकस्टार' या चित्रपटापासून आवडत होता. त्याचा अभिनय फार छान आहे. त्याला जेव्हा मी हा सीन सांगितला तेव्हा त्याने काहीच विचार न करता होय आपण करूया हा सीन असे म्हटले. फार छान वाटले त्याच्यासोबत काम करून."

टॉलिवूडमध्ये एंट्री करणार?

तमिळ चित्रपटांत काम करण्याबाबत विचारले असता, बघू पुढे जर काय झाले तर नक्की काम करू, असेही उपेंद्रने म्हटले. त्यामुळे उपेंद्र लवकरच एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात दिसला तरी आश्चर्य वाटायला नको.

अॅनिमलचा 500 कोटींचा गल्ला -

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शक केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तृप्ती डिमरीने देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाने जगभरात जवळजवळ 500 कोटींचा गल्ला जमवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in