Danka Harinamacha Movie: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका करत अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. आगामी ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिचं पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यात ती बेधडक आणि डॅशिंग लूक मध्ये दिसत आहे. झाशा या व्यक्तिरेखेत ती या चित्रपटात दिसणार आहे. व्हीलनच्या ताफ्यात राहून आपल्या भावासोबत झालेल्या अन्यायाचा बदला ती कशाप्रकारे घेते? हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने सांगितलं कि, ‘ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं’. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं ती सांगते.
निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.