क्रिकेटपटू ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ऋषभ पंतच्या एका जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे. त्याच्या नव्या जाहिरातीमध्ये शास्त्रीय संगीताचा अपमान केला असल्याचा आरोप दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केला आहे. तसेच, ही जाहिरात लवकर सर्व ठिकाणांहून हटवावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
ड्रीम ११ची ही जाहिरात असून त्याने एका संगीतकाराच्या वेशभुषेत बेसूर गात असल्याचा अभिनय केला आहे. यावर आता सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 'ऋषभ पंतने भारतीय संगीताचा अपमान केला आहे' अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
ड्रीम ११ची ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी टीका केली की, ऋषभ पंतने त्यात भारतीय संगीताचा अपमान केला. अनेकजण त्यावर कमेंट करत राग व्यक्त करत आहेत. अशामध्ये आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा ट्विट करत टीका केली. ते म्हणाले की, "ही अत्यंत वाईट आणि अपमानकारक जाहिरात आहे. स्वत:चे प्रमोशन करा, पण कला आणि संस्कृतीला कमी लेखून नका. मी या जाहिरातीला हटवण्याची मागणी करतो."