नाट्य परीक्षण : 'नियम व अटी लागू', हसत खेळत रंगणारं नाटक

नाट्य परीक्षण : 'नियम व अटी लागू', हसत खेळत रंगणारं नाटक

गौरी थिएटर आणि प्रशांत दामले फॅन फॉउंडेशन यांनी ' नियम व अटी' याचे प्रयोग सातत्यानं केले पाहिजेत कारण अशा नाटकाची सध्या गरज

संजय कुळकर्णी

व्यावसायिक रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी सहा सात व्यक्तिरेखा असलेल्यांची नाटकं यायची. कालांतरानं त्या व्यक्तिरेखा नाटकात कमी होऊ लागल्या.सर्वच नाटकांबद्दल असे नसेलही पण सध्या जी काही नाटकं आली त्याबद्दल बोलतोय. निर्मात्यांना तशा प्रकारची नाटकं हवी असतात. कारण दौरे हेचं महत्वाचं कारण आहे. सुटसुटीत पात्र असली की दौऱ्याची चिंता नसते. आर्थिक बोजा निर्मात्यांच्या अंगावर पडतं नाही. हीचं खरी वस्तुस्तिथी आहे. आज हे लिहावयाचे कारण म्हणजे नुकतंच संकर्षण कऱ्हाडे यांचं ' नियम व अटी ' हे नाटक पाहिलं. त्याआधी ' तू म्हणशील तसं ' हे नाटक पाहिलेलं होतं. त्या नाटकात दोन पात्रचं होती. याचा अर्थ संकर्षण कऱ्हाडे यांना दोन पात्र असलेल्या नाटकाच्या लेखनाचा सराव हा झालेला आहे. त्या नाटकांना रसिकांचा प्रतिसाद उत्तम असल्यामुळे लेखनात ते यशस्वी झालेले आहेत असं म्हटलं तर त्यात वावगं असे काहीच नाही .

' नियम व अटी ' या नाटकात पती - पत्नी यांच्या समस्येवर लेखकानं भाष्य केले आहे. त्यासाठी नियम व अटी पती - पत्नी यांच्या नात्याला लागू करायच्या म्हटल्या तर काय होऊ शकेल हे नाटकात प्रकर्षानं पाहायला मिळते. अमृता आणि अनिकेत हे विवाहित जोडपं. अनिकेत एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला असल्यामुळे दहा - दहा तास दररोज कामात व्यग्र असल्यामुळे तो अमृताला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकतं नाही. अमृताची त्याच्याबद्दल तीच नाराजी आहे. कुठेही जायचं असेल तर अनिकेत जाऊ शकतं नाही कारण त्याचे काम. तरीही ती सहन करते. पण त्याचा अतिरेक झाला की नाईलाजाने अमृता अनिकेतला ती बाब निदर्शनास आणून देते. कामामुळे ते शक्य होतं नाही हे कारण तिला मात्र पटतं नाही. अमृताची बहीण त्या दोघांना कॉऊन्सिलर यांच्याकडे जाण्याचा सल्ल्ला देते. ती दोघं कॉऊन्सिलर अतिरेककर यांच्याकडे जातात. ते त्यांना दहा नियम आणि अटी घालून त्यांचे कॉउंसिलिंग करतात. काय असतात ते नियम आणि अटी? ते पाहण्यातच गंमत आहे. ते पाळतांना त्या जोडप्याची होणारी तारांबळ पाहताना आपण सुद्धा कळत नकळत विचार करू लागतो .ते आपल्याला कसे एकदम फिट्ट बसतात या भूमिकेनं आपण नाट्यगृहातून बाहेर पडतो.

संकर्षण कऱ्हाडे हे कवी मनाचे लेखक असल्यामुळे त्यांच्या पाहिलेल्या नाटकात पती - पत्नी यांच्यातील वेगवेगळ्या समस्या त्यांनी विनोदी ढंगात मांडलेल्या आहेत. याही नाटकात त्याचा प्रत्यय आला. त्यांची प्रत्येक समस्येवर विचार करण्याची दृष्टी दिसली. दोन ते तीन पात्रांचे नाटक असल्यामुळे लेखनात कुठेही क्लिष्ट होणारं नाही याची दक्षता त्यांनी लेखनात घेतलेली दिसलेली आहे. त्यांनी मांडलेला लेखाजोखा हा पूर्णतया कथानकाशी निगडित असल्यामुळे प्रत्येक प्रवेश हे कंटाळवाणे वाटतं नाही. त्यांची लेखनाची संवाद शैली ही अलंकारी नसून त्याला कवित्वतेचा साज दिलेला आहे. त्यांनी अमृता आणि अनिकेत या दोन व्यक्तिरेखेस लेखनात तेवढंच उजवं माप दिल्यामुळे कुठलीही व्यक्तीरेखा वरचढ ठरलेली नाही. अतिरेककर हा त्यांनी लेखनात लिहिलेला अर्कचित्राचा नमुनाच. चांगल्या संहितेला जेव्हा कल्पक दिग्दर्शकाचा परीस स्पर्श होतो तेंव्हा ती कलाकृती तेजाळून उठते. चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शकाने ' नियम व अटी ' हे नाटक दिग्दर्शित केल्यामुळे प्रत्येक प्रवेश कुठे संपवावा आणि नाटकाच्या संवादाचे संकलन कसे करावे याचे हे नाटक म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. कलाकारांची केलेली योग्य निवड आणि त्यांना संवादातील आरोह अवरोह याचे केलेले योग्य मार्गदर्शन हे कल्पक दिग्दर्शकाचे द्योतक आहे. तीन पात्रांचे नाटक असूनही ते खेळकर हालचालीमुळे रंगतदार झालेले आहे. प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्याची त्यांना साथ चांगलीच मिळालेली आहे. अनिकेतचं घर आणि त्याची रंगसंगती जशी नजरेत भरते तसेच अतिरेककर कॉऊन्सिलर यांचे कार्यालय म्हणजे एका जादूगारचेच वाटते ते कधी कपाटातून येतात तर कधी दरवाजातून हे मजेशीर आहे.तसेच अमृताचे नागपूर मधील घरं नेपथ्यात ठिगळ लावल्यासारखे आहे. कारण ती कॉट फारच विचित्र वाटली. त्यावर प्रदीप मुळ्ये यांनी विचार करायला हवा. त्याचा मार्मिकपणे वापर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेला आहे. किशोर इंगळे यांची प्रकाश योजना यथायोग्य. त्यांनी काहीही प्रकाश योजनेत गिमिक्स केलेले नाहीत.

संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांच्या अभिनयाची केमिस्ट्री मस्त जुळून आली आहे . अनिकेतच्या भूमिकेत संकर्षण भाव - भावनांचे विविध कंगोरे पेश करताना व्यक्तिरेखेचं बेअरिंग मस्तपैकी सांभाळतो. त्यांनी लिहिलेल्या संवादातील गर्भित अर्थ प्रकट करताना जो स्वर लावतो तो स्पर्शून जातो. तसेच तो एक गाणं या नाटकात गातो. आवाज आणि सूर यांचं मिश्रण तो योग्यरित्या करतो. आता तो प्रशांत दामले यांच्या पावलावर पाऊल ठेवणारं की काय अशी निसटती शंका येऊन गेली. अमृता देशमुख यांनी अमृता देहबोलीतून पेश करताना पकडलेली संवाद बोलण्याची ढब त्या व्यक्तिरेखेला साजेशीच. तिच्या स्वरात एक आर्तता आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाची सांगड अमृताला जुळून आलेली आहे. त्यांना प्रथमच व्यावसायिक या नाटकात पाहिलं. एक अभिनय संपन्न सशक्त अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीला या नाटकाद्वारे मिळाली आहे. अतिरेककरच्या भूमिकेत प्रसाद बर्वे हे पाहाता क्षणीक प्रशांत दामले यांची आठवण करून देतात. त्यांनी देहबोलीतून ती भूमिका निभावलेली आहे. तरीही प्रशांत दामले यांनी अतिरेककर भूमिका साकारली असती तर या नाटकास बहार आली असती असं वाटून गेलं. एकूण काय ' नियम व अटी ' हे नाटक दोन घटका करमणूक जरी करतं असले तरी पती पत्नीला अंजन देऊन जाते. नाटक पाहिल्यावर त्यांच्यात नक्कीच वागण्या बोलण्यात बदल होऊ शकतो. ती मोठी जबाबदारी लेखक संकर्षण कऱ्हाडे यांनी उत्तमरित्या पार पडलेली आहे. गौरी थिएटर आणि प्रशांत दामले फॅन फॉउंडेशन यांनी ' नियम व अटी' याचे प्रयोग सातत्यानं केले पाहिजेत कारण अशा नाटकाची सध्या गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in