२५ प्रयोगांचा यशस्वी टप्पा अन् पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप; 'एक तिची गोष्ट' चा रंगला रौप्यमहोत्सव

मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स आणि पीएसडीजी स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मितीतून 'एक तिची गोष्ट' हे नृत्यनाट्य साकारण्यात आले आहे.
२५ प्रयोगांचा यशस्वी टप्पा अन् पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप; 'एक तिची गोष्ट' चा रंगला रौप्यमहोत्सव
२५ प्रयोगांचा यशस्वी टप्पा अन् पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप; 'एक तिची गोष्ट' चा रंगला रौप्यमहोत्सव
Published on: 

मराठी रंगभूमीवरील 'एक तिची गोष्ट' या नृत्यनाट्याने यशस्वी २५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी उपस्थिती लावली. नृत्य, अभिनय आणि भावनांचा सुंदर संगम असलेल्या या नृत्यनाट्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. 'अद्भुत' अशा शब्दांत त्यांनी या प्रयोगाला दाद दिली.

मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स आणि पीएसडीजी स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मितीतून 'एक तिची गोष्ट' हे नृत्यनाट्य साकारण्यात आले आहे. विराजस कुलकर्णी यांनी या नृत्यनाट्याचे लेखन केले असून, सूरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. गौरी कालेलकर-चौधरी, सिद्धेश चौधरी आणि फुलवा खामकर हे या नृत्यनाट्याचे निर्माते आहेत.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, त्यांची कन्या आस्मा खामकर आणि ओमकार गोखले यांच्या कलाविष्कारातून या नृत्यनाट्याची कथा उलगडते. नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर होणारा हा प्रयोग प्रेक्षकांना वेगळा अनुभव देत आहे.

नीना कुलकर्णी, संदीप सोपारकर यांच्याकडूनही कौतुक

'एक तिची गोष्ट' या नृत्यनाट्याला केवळ प्रेक्षकांचाच नव्हे, तर चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी या नाटकाचे कौतुक करताना हा प्रयोग सकारात्मकतेची नवी ऊर्जा देणारा आणि आयुष्याकडे नव्या रंगांनी पाहण्याची प्रेरणा देणारा असल्याचे म्हटले. तर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांनी 'संपूर्ण प्रयोग फॅन्टास्टिक होता!' अशा शब्दांत कलाकारांचे कौतुक केले.

या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला अभिनेत्री उर्मिला कानिटकर, मनवा नाईक, स्मिता तांबे, शर्वरी पाटणकर, उमेश जाधव, सुशांत शेलार, मृणाल देशपांडे, दीपा चौधरी आणि सुखदा खांडकेकर यांच्यासह चित्रपट व नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

२५ प्रयोगांचा यशस्वी प्रवास, प्रेक्षकांचे प्रेम आणि पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याकडून मिळालेली कौतुकाची थाप यामुळे 'एक तिची गोष्ट'च्या टीमचा उत्साह नक्कीच वाढला आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)