मुंबई : महिलांना कामाच्या ठिकाणी समान संधी आणि व्यवस्थापनात उच्च पदांवर अधिकाधिक वाव मिळाला पाहिजे. तसे झाले तरच महिलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांना आळा बसेल़. आणि यामुळे कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल, असे ठाम मत टीव्ही मालिका निर्माती एकता कपूर यांनी व्यक्त केले आहे़.
मल्याळी सिनेउद्योगात महिलांवरील लैंगिक शोषणासंबंधी न्या़. हेमा समितीचा अहवाल नुकताच जाहीर झाला आणि त्यावर एकच खळबळ उडाली़ आहे. आपल्या मालिकांमध्ये महिलांना नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये सादर करणाऱ्या एकता कपूर यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देताना, महिलांनी आता कंपन्या-उद्योग चालवण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले़.
मुंबईत एका कार्यक्रमात त्याच्या कंपनीनिर्मित द बंकिंगहॅम मर्डर शोचा ट्रेलर सादर करण्यात आला. यावेळी एकता कपूर बोलत होत्या़ एकता यांनी ९० च्या दशकात दूरचित्रवाणीवर सादर केलेली महिलाकेंद्रित क्योंकी सास भी कभी बहु थी ही मालिकी गाजली होती.
कपूर म्हणाल्या की, महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़. सिनेउद्योगातच नाही तर अन्य क्षेत्रांत महिलांना काम करताना सुरक्षित वाटले पाहिजे़. कंपन्यांमध्ये महिला पुढे येऊन उच्च पदांवर काम करू लागल्यास इतर महिलांचाही आत्मिविश्वास वाढेल. सध्या तरी असे चित्र पाहायला मिळत नाही. आता मात्र वेळ आली आहे. याची सुरूवात झाली पाहिजे़. महिलांच्या सुरक्षेची बाब गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे़.