ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर साकारणार 'फुलराणी'

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पहाण्यासाठी सेलिब्रेंटीपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती
ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर साकारणार 'फुलराणी'

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पहाण्यासाठी सेलिब्रेंटीपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येकजण आपल्यापरीने तर्कवितर्क लावत होते. एवढंच नाही तर, सोशल मिडीयावरही मराठी सेलिब्रेंटीनी सुबोधला टॅग करून ‘सुबोध ‘कोण आहे तुझी फुलराणी?’ हे विचारून या उत्सुकतेमध्ये आणखी भर पाडली. नेटकऱ्यांनी याला खूप छान प्रतिसाद देत ‘फुलराणी कोण’? याचे अंदाज बांधले. प्रत्येकाची उत्सुकता आणि आडाखे रंगले असताना, अखेर ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं.... आपल्या असण्याने आनंद पसरवणारी ‘फुलराणी’ आज रंगमंचावर अवतरली. तिला पाहून चिडवणाऱ्याला 'फुलवाली नाय फुलराणी' असं ठणकावून सांगणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर रंगमंचावर अवतरली आणि सगळयांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. टाळ्यांच्या कडकडाटात ‘फुलराणी’ झालेल्या प्रियदर्शनीने सगळ्यांना जिंकून घेतलं. सोबत चित्रपटातील एक छोटी झलकही उपस्थितांना यावेळी पहायला मिळाली. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'फुलराणी' प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या अनोख्या मनमोहक रूपात दर्शन दिलं. या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते, ‘पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. 'फुलराणी'तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं असल्याची भावना प्रियदर्शनीने व्यक्त केली’. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे. ‘प्रियदर्शिनी ते शेवंता' बनण्याचा आपला प्रवास अत्यंत आश्चर्यकारक प्रवास अनपेक्षितपणे पूर्ण झाल्याचं सांगत 'फुलराणी' म्हणजेच प्रियदर्शनी म्हणाली की, खरं तर 'फुलराणी' सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. 'फुलराणी'साठी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या गाजलेल्या दृश्याचं आॅडीशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एक तर माझं याबाबत पाठांतर नव्हतं आणि बऱ्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही 'फुलराणी'साठी सिलेक्ट होणार नसल्याचं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी कॅाल आला आणि मला आॅफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ, पण फिल्म मिळेल असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वाससरांनी मला लॅाक केलं होतं हे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच 'फुलराणी' बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली 'फुलराणी' म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. 'फुलराणी' बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं असंही प्रियदर्शनी म्हणाली.

‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

या सोहळ्याला लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशी, जाई जोशी, स्वानंद केळकर, अमृता राव, श्वेता बापट, लेखक आणि कवी गुरू ठाकूर, यांच्यासह चित्रपटाची पडद्यामागची टीम उपस्थित होती. संगीतकार नीलेश मोहरीर, वरुण लिखाते, पार्श्वसंगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि कवी मंदार चोळकर हे सुद्धा उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in