अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितले तिच्या निर्भिडपणाचे कारण; म्हणाली...

प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या अभिनयासोबतच निर्भीडपणे सोशल मीडियावर व्यक्त होत असल्याने नेहमी चर्चेत असते
अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितले तिच्या निर्भिडपणाचे कारण; म्हणाली...
@hemangi kavi facebook

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, ती अनेक मुद्द्यांवरून सोशल मीडियावर निर्भीडपणे व्यक्त होताना दिसते. तिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये आपल्या निर्भीड स्वभावाचे कारण सांगितले आहे. यावेळी तिने आपल्या आई-वडील आणि बालपणातील काही गोष्टी समोर मांडल्या. या मुलाखतीमध्ये तिला, 'तुझ्यामध्ये हा निर्भीडपणा कसा आला?' असा प्रश्न विचारला. यावरून तिने बिनधास्तपणे आपले उत्तर दिले.

हेमांगी कवी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाली की, " मला कोणी बोल्ड, निर्भीड, बिनधास्त असे म्हटलं की, मला आश्चर्य वाटते. कारण, मी जे बोलते त्या गोष्टी बोलल्या गेल्याच पाहिजेत. मी निर्भीड असण्यामागे एक कारण म्हणजे माझे बाबा. माझ्या बाबांनी माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये कधीच फरक केला नाही. टायटॅनिक, दयावानसारखे बोल्ड चित्रपट आम्ही एकत्र बसून पाहिले आहेत. माझी आई सातवी पास आणि माझे बाबा एलएलबी होते. छोट्या वन रुम किचनमध्ये आम्ही राहात होतो. तसेच, आई- बाबांची प्रायव्हसीही आम्ही पाहिलेली असून एकदा माझ्या ताईला मी प्रश्न विचारला होता की, आई-बाबा काय करत होते? तेव्हा तिने माझ्यासोबत त्या विषयांवर चर्चा केली होती." असे परखड मत तिने मांडले आहे.

तसेच, हेमांगीने आपल्या कारकिर्दीमधील आलेल्या एका गोष्टीचा उलगडादेखील केला. ती म्हणाली की, "मला माझ्या सावळ्या रंगावरून ६ प्रोजेक्ट्समधून नकार मिळाला होता. एका चॅनलवाल्याने तर मला सांगितले की आमच्या मालिकेच्या संपूर्ण इतिहासात आमची हिरोईन काळी नाही आहे. यानंतर मी ओके म्हणून बाजूला झाले. कारण मी नेहमीप्रमाणे त्यांना यात त्यांचेच नुकसान आहे, असे म्हणून स्वतःला समजावले." असा अनुभवदेखील तिने यावेळी सांगितला. तिने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. तसेच, मराठी चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विनोदी तशाच गंभीर भूमिकाही तिने उत्तमरीत्या साकारल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in