

नवी दिल्ली : दिग्दर्शक नीरज घेवान यांच्या 'होमबाऊंड' चित्रपटाला ९८व्या अकादमी पुरस्कारांमध्ये म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीतील टॉप १५ शॉर्टलिस्टेड चित्रपटांमध्ये स्थान मिळाले आहे. या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने मंगळवारी १२ श्रेणींची शॉर्टलिस्ट जाहीर केली. तर, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये एकूण १५ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यापैकी पुढे केवळ ५ चित्रपटांना अंतिम नामांकन मिळेल. या नामांकनांची घोषणा २२ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल. त्यानंतर ऑस्कर पुरस्कार सोहळा १५ मार्च २०२६ रोजी पार पडेल.
‘होमबाऊंड’सोबत ज्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे, त्यात अर्जेंटिनाच्या ‘बेलेन’, ब्राझीलच्या ‘द सिक्रेट एजंट’, फ्रान्सच्या ‘इट वॉज जस्ट एन ॲक्सिडेंट’, जर्मनीच्या ‘साउंड ऑफ फॉलिंग’, इराकच्या ‘द प्रेसिडेंट्स केक’, जपानच्या ‘कोकुहो’, जॉर्डनच्या ‘ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू’, नॉर्वेच्या ‘सेंटिमेंटल व्हॅल्यूज’, पॅलेस्टाईनच्या ‘पॅलेस्टाईन ३६’, दक्षिण कोरियाच्या ‘नो अदर चॉईस’, स्पेनच्या ‘सिरात’, स्वित्झर्लंडच्या ‘लेट शिफ्ट’, तैवानच्या ‘लेफ्ट हँडेड गर्ल’ आणि ट्युनिशियाच्या ‘द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ या चित्रपटांचा समावेश आहे.