
''त्रिवेणी संगमावर मी जेव्हा पाण्यात उतरलो, तेव्हा मी कधी रडायला लागलो हे माझं मलाच कळलं नाही. मी का रडलो, माझ्या डोळ्यातून का अश्रू येत होते हे मला माहीत नाही. हा एक थक्क करणारा अद्भूत अनुभव होता. महाकुंभमेळा हा सनातन धर्म, मानवता, प्रेम आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव! या क्षणाची अनुभूती शब्दांत मांडता येणार नाही. खरंच दिव्य अनुभव!'' असे अभिनेता स्वप्नील जोशीने सांगितले. तसेच महाकुंभमेळ्यातील उत्तम व्यवस्थापनासाठी प्रशासनाचे देखील त्याने कौतुक केलं आहे. महाकुंभमेळ्यातील अमृत स्नान करून परतल्यानंतर नवशक्तिला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत स्वप्नील जोशीने महाकुंभमेळ्यात आलेला अविस्मरणीय अनुभव शेअर केला.
ख-या अर्थाने मानवता, प्रेम, सद्भावना यांचा उत्सव
''महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचा आणि महासंगमात पवित्र स्नान करण्याचा योग आला. आयुष्यातले काही अनुभव असे असतात की जे तुम्ही खरंच शब्दांत वर्णन करूच शकत नाही. माझी ती प्रतिभा नाही की मी सोप्या शब्दांत सांगू शकेन. तो जनसमुदाय, प्रत्येकाची ती आर्तता, स्पीकरवर सुरु असणारे मंत्रोच्चार, जागोजागी असणारे लंगर, अनेक तपस्वी साधू, महर्षी, अनेक होमहवन, यज्ञ, आणि या सगळ्यात ख-या अर्थाने मानवता, प्रेम, सद्भावना यांचा उत्सव. हिंदूत्वाचा महायज्ञ असंच त्याला म्हणावं लागेल. त्रिवेणी संगमावर मी जेव्हा पाण्यात उतरलो, तेव्हा मी कधी रडायला लागलो हे माझं मलाच कळलं नाही. मी का रडलो, माझ्या डोळ्यातून का अश्रू येत होते हे मला माहीत नाही. महाकुंभमेळा आहे १४४ वर्षातून एकदा हा योग येतो. सगळी पापं धुवून निघतात हे सगळं कमालच आहे पण मला असं वाटतं की हा भारताचा माणुसकी आणि प्रेमाचा आणि आपली संस्कृती यांचा सर्वात मोठा उत्सव आहे. सनातन धर्म किती मोठा आहे आणि किती मोठी ताकद त्यात एकवटलीय हे सगळं तिथे अनुभवायला मिळालं. हा अनुभव शब्दातीत आहे. केवळ थक्क करणारा आणि अद्वितीय आनंद देणारा आहे. तिथे जाऊन मी कुटुंब आणि प्रियजनांसाठी प्रार्थना केली, सकारात्मक ऊर्जा आत्मसात केली, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! या अद्भुत महाकुंभाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळणं, हा दैवी आशीर्वाद वाटतो," असे स्वप्नील म्हणाला.
महाकुंभमेळ्यातील व्यवस्थापन अतिशय उत्तम
स्वप्नील जोशीने महाकुंभमेळ्यातील व्यवस्थापनाचेही कौतुक केले. तो म्हणाला, ''तेथील व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे याचं आवर्जून कौतुक करायला हवं. दिवसाला २-३ कोटी लोकं येत आहेत पण त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय ही उत्तम आहे. यासाठी प्रशासनाचं कौतुक करायला हवं,'' असे तो म्हणाला.