मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची राज्य सायबर सेल पोलिसांकडून चौकशी होणार आहे. फेअर प्ले बेटींग ॲपप्रकरणी तिला येत्या सोमवारी २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.
वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएलच्या क्रिकेट सामन्याचे प्रसारणाचे हक्क आहे. तरीही फेअर प्ले बेटींग ॲॅपने आयपीएलच्या सामन्याचे बेकायदेशीरपणे प्रक्षेपण दाखवून कंपनीची फसवणूक केली होती. या प्रक्षेपणामुळे कंपनीला शंभर कोटीहून अधिक नुकसान झाले. परिणामी, कंपनीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सायबर सेल विभागात तक्रार केली होती.
ही तक्रार आल्यानंतर पोलिसांनी स्वामित्व हक्कांचे उल्लघंन केल्याप्रकरणी फेअर प्ले ॲॅपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या ॲपची सिनेअभिनेता संजय दत्त, सुनिल शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्यासह ४० हून अधिक कलाकारांनी प्रमोशन अर्थात जाहिरात केली होती. त्यामुळे तमन्नाला येत्या २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज्य सायबर सेलकडून देण्यात आले होते. जाहिरातीसाठी कोणी संपर्क साधला आणि त्यासाठी किती मानधन मिळाले याबाबत तिची चौकशी होणार आहे.