वास्तव दाखवणाऱ्या चित्रपटांपुढे अडथळे; अश्लील चित्रपटांना मात्र सहज मंजुरी, जावेद अख्तर यांची खंत

समाजातील वास्तव दाखवणाऱ्या चित्रपटांना मंजुरीसाठी अडथळ्यांचा सामना करावा लागतो, तर अश्लीलता भरलेले चित्रपट मात्र सहज मंजूर होतात, असे मत व्यक्त करत ज्येष्ठ पटकथालेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपट सेन्सॉर यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : समाजातील वास्तव दाखवणाऱ्या चित्रपटांना मंजुरीसाठी अडथळ्यांचा सामना करावा लागतो, तर अश्लीलता भरलेले चित्रपट मात्र सहज मंजूर होतात, असे मत व्यक्त करत ज्येष्ठ पटकथालेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपट सेन्सॉर यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘अनंतरंग’ या मानसिक आरोग्य विषयक सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात अख्तर बोलत होते. वाईट प्रेक्षकच वाईट चित्रपटांना यशस्वी बनवतात, असे अख्तर म्हणाले.

या देशात अश्लीलता असलेले चित्रपट सेन्सॉरमधून पार होतात. पण ते चुकीच्या मूल्यांना प्रोत्साहन देतात . महिलांचा अपमान करणारा पुरुषप्रधान दृष्टिकोन दाखवतात. मात्र, जे चित्रपट समाजाला आरसा दाखवतात, तेच थांबवले जातात, असे ते म्हणाले.

चित्रपटांमधील अति-पुरुषत्व आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी बोलताना अख्तर म्हणाले की, अशा चित्रपटांची लोकप्रियता ही समाजाच्या मानसिकतेमुळेच आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा झाली, तर असे चित्रपट बनणारच नाहीत, आणि बनले तरी चालणार नाहीत.

अख्तर यांनी चित्रपटांतील वाढत्या ‘अश्लील’ गाण्यांवरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मी असे गाणे लिहिण्याचे प्रस्ताव नेहमी नाकारले आहेत. कारण ते माझ्या मूल्यांशी सुसंगत नाहीत.

ते म्हणाले की, विशेषतः ८०च्या दशकात अनेक गाण्यांना दुहेरी अर्थ असायचा. मला लोकांनी अशी गाणी रेकॉर्ड केली याचे दुःख नाही, पण ती सुपरहिट झाली याचे दुःख आहे. म्हणजेच, चित्रपटांना प्रेक्षकच दिशा देतात.

अशा प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ चित्रपटाचे कौतुक केले.

‘सैयारा’सारखा चित्रपट आला की त्याचे संगीत जुना गोडवा आणि शांततेचा स्पर्श देते. आजच्या काळात संगीत गोंगाटमय झाले आहे. त्यामुळे जर असा एखादा चित्रपट थोडासा निवांतपणा देतो, तर तो सूर्याच्या तीव्र प्रकाशात सावली मिळाल्यासारखा वाटतो,” असे त्यांनी सांगितले.

जबाबदारी समाजाची आहे...

‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याचे उदाहरण घ्या. मी अनेक पालकांना अभिमानाने सांगताना ऐकले आहे की, त्यांची आठ वर्षांची मुलगी या गाण्यावर उत्तम नाचते. जर समाजाचे मूल्य असे असतील, तर तुम्ही गाणी आणि चित्रपटांकडून काय अपेक्षा ठेवणार? त्यामुळे जबाबदारी समाजाची आहे, सिनेमे हे फक्त त्याचे प्रतिबिंब आहेत, असे अख्तर म्हणाले. ते म्हणाले की, “दुःख नाकारणे योग्य नाही; अन्यथा ते दुसऱ्या स्वरूपात प्रकट होते. आधीच्या चित्रपटांत एक-दोन दुःखी गाणी असायची, पण आता ती नाहीत. कारण ‘आपले अच्छे दिन आ गए हैं.’ पण ही नकारात्मक वृत्ती मानसिक दृष्ट्या अपायकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in