जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढल्या, मुलुंड कोर्टाचे नव्याने समन्स

गेल्याच महिन्यात सत्र न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळली होती
जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढल्या, मुलुंड कोर्टाचे नव्याने समन्स

तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित कथित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने समन्सबजावूनही गैरहजर रहाणाऱ्या जावेद अख्तर यांना गुरुवारी मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयाने नव्याने समन्स बजावून सुनावणी २० जून ला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया उमटत असताना अख्तर यांनी दोन वर्षांपूर्वी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तालिबानची तुलना आरएसएसबरोबर केली होती. संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे अख्तर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी आरएसएसचे कट्टर समर्थक अ‍ॅड. संतोष दुबे यांनी अख्तर यांच्या वक्तव्यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप करतमुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम ४९९ (मानहानी), ५००(बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी मुलूंड दंडाधिकारी न्यायालयाने दखल घेत अख्तर यांना यापूर्वी समन्स बजावले होते. त्या विरोधात त्यांनी सत्र न्यायालयात दाद मागतील होती. मात्र, गेल्याच महिन्यात सत्र न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर गुरुवारी अख्तर गैरहजर राहिल्याने दंडाधिकारी न्यायालयाने अख्तर यांना नव्याने समन्स बजावून २० जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in