
तब्बल १० वर्षांनी अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावेळी विशेष सीबीआय न्यायालयाने पुराव्याच्या कमतरतेमुळे हा निर्णय जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता जिया खानची आई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत. जिया खानची आई राबिया खान म्हणाल्या की, "सुरज पांचोलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. पण माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला? हे हत्येचे प्रकरण असून आम्ही उच्च न्यायालयात जाणार" असे सांगितले आहे.
नेमकं प्रकरण काय?
३ जून २०१३ रोजी अभिनेत्री जिया खानचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला होता. यामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. त्यानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला. जिया खानने आत्महत्येअगोदर एका ६ पानी पत्रामध्ये सुरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. याच पत्राच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने दावा केला होता की, या पत्रामध्ये तिचे सुरज पांचोलीशी जवळचे संबंध होते. तसेच त्या पत्रात तिचे शारीरिक शोषण आणि मानसिक छळ करण्यात आल्याचे लिहिले होते. यावरून गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद संपला होता. त्यानंतर आज सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी पुराव्याच्या कमतरतेमुळे सुरज पांचोली याची निर्दोष मुक्तता करत आहे, असा निकाल दिला.