जॉन अब्राहम म्हणतो, “अटॅक हा उद्याच्या जगासाठी अॅक्शनपट आहे”

तसं करताना आम्ही राष्ट्रभक्तीची भावना जागती ठेवली आहे. हा चित्रपट कोणत्याही पिढीतील प्रेक्षक पाहू शकतो
जॉन अब्राहम म्हणतो, “अटॅक हा उद्याच्या जगासाठी अॅक्शनपट आहे”

येत्या 26 जून रोजी रात्री 8.00 वाजता ‘झी सिनेमा’ वाहिनीवरून ‘अटॅक’ या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रसारित केला जाणार असून त्यात देशाला वाचविण्यासाठी सुपर सोल्जर चा संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा अस्सल भारतीय असली, तरी त्यातील अॅक्शन प्रसंग हे जागतिक तोडीचे आहेत. त्यात जॉन अब्राहम हा सुपर सोल्जरच्या प्रमुख भूमिकेत असून त्यात रकुलप्रीत सिंग आणि जॅकेलिन फर्नांडिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अॅक्शन चित्रपटाच्या गटाला नव्या उंचीवर घेऊन जाणार्‍्या या चित्रपटाबद्दल बोलताना जॉन अब्राहमने आगळ्या चित्रपटांची निवड, ‘अटॅक’ची निर्मिती आणि अॅक्शनपटांबाबत केले जाणारे प्रयोग याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.


हा चित्रपट एका अगदी नव्या संकल्पनेवर आधारित आहे. एक निर्माता म्हणून या चित्रपटाची निर्मिती तुला का करावीशी वाटली आणि एक अभिनेता म्हणून यात का भूमिका करावीशी वाटली?
भारतीय चित्रपटांतील अॅक्शन प्रसंगांना मला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं होतं आणि या चित्रपटाने मला ती संधी दिली. पण खरं सांगायचं झाल्यास हा अॅक्शनबद्दल नसून त्यामागील दृष्टिकोनाबद्दल असून चित्रपटात आम्ही तीच गोष्ट राखण्याचा प्रयत्न केला आहे. एक निर्माता म्हणून अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करताना मी खूप मोठी जोखीम उचलत होतो. तुम्ही नेहमी ज्या प्रकारच्या भूमिका साकारता, तशीच आणखी एक भूमिका साकारावी लागल्यास तुम्ही निराश होता. पण जर तुम्ही काहीतरी वेगळं करीत असाल आणि त्याच्या अपयशाची जोखीम तुम्ही उचलत असाल, तर निदान काहीतरी नवं केल्याचं समाधान तरी तुम्हाला मिळतं. मला अॅक्शनमध्ये नवं आणायचं होतं आणि नेहमीचा सुरक्षित अॅक्शनपट काढायचा नव्हता. ‘अटॅक’ हा उद्याच्या जगासाठीचा चित्रपट आहे. तुम्ही जर आजच्या आधुनिक युध्दसामग्रीकडे पाहिलं, तर तिथे तुम्हाला नेहमीची पारंपरिक सामग्री आढळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेऊन आम्ही या चित्रपटात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसं करताना आम्ही राष्ट्रभक्तीची भावना जागती ठेवली आहे. हा चित्रपट कोणत्याही पिढीतील प्रेक्षक पाहू शकतो, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे.

तू भूमिका साकारलेल्या अटॅक, बाटला हाऊस, नो स्मोकिंग वगैरे चित्रपटांचा विचार केला, तर तू नेहमीच वेगळ्या संकल्पनेवरील चित्रपटांची निवड केल्याचं दिसतं. तू कशा प्रकारे चित्रपट निवडतोस?
आपल्याला जीवनात काय हवं आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. तुम्हाला पैसा पाहिजे की आदर? मला आदर हवा होता. मी निवडलेल्या प्रत्येक चित्रपटाची मी जबाबदारी घेतो. आपण दररोज काही ना काहीतरी शिकतच असतो. प्रत्येक दिवस ही एक नवी निवड असते. तुमचं कधी तरी खूप चुकतं, तर कधी तुमचा निर्णय उत्तम ठरतो. हा निर्णय तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजावर घ्यावा लागतो. मला आता अपयशाची भीती वाटत नाही. कारण तुम्हाला दुसरी संधी नक्कीच उपलब्ध असते. म्हणूनच मी अगदी चाकोरीबाहेरील चित्रपटांची निवड करतो. अशा चित्रपटांमुळे मला काम करीत राहण्याची प्रेरणा मिळत राहते.

तू आतापर्यंत अशा अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारली आहेस ज्यात राष्ट्रभक्तीच्या भावनेचा अंत:प्रवाह वाहात असतो. मग राष्ट्रभक्तीच्या भावनेला तंत्रज्ञानाची जोड देणार्‍्या चित्रपटाची तू निवड का केलीस?

राष्ट्रभक्ती आणि तंत्रज्ञान यांचा एकत्र वापर ही फार दुर्मिळ घटना आहे. पण ती प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवते. अशा प्रकारचे जे परदेशी चित्रपट आपण पाहतो, ते आपल्याला खूप आवडतात. तेव्हा मी विचार केला- भारतात असा चित्रपट का बनू शकत नाही?
त्यामुळेच अटॅक चित्रपटाद्वारे आम्ही भारतातील असा एकमेव वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनविला आहे. प्रेक्षकांमध्ये सतत उत्कंठा वाढविणारा सायन्स फिक्शन थरारक चित्रपट बनविण्याची आमची कल्पना होती. पण त्या प्रक्रियेत आम्ही भारतातील पहिला सुपर सोल्जर चित्रपट बनविला. चित्रपट पाहताना प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढेल आणि त्यांच्या विचारांना धक्का देईल, अशा चित्रपटांमध्ये मला भूमिका साकारण्याची इच्छा असते. पण खरा उद्देश ज्यात मलाही आनंद मिळेल, असा एक उत्तम चित्रपट बनविणं हा असतो.

तू बर्‍्याच अॅक्शन चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेस, तेव्हा त्यातील तुझा आवडता भाग कोणता असत?
अॅक्शन हिरो बनण्यासाठी तुम्हाला आधी अॅक्शन हिरोसारखं दिसावं लागतं. तुमची शरीरयष्टी आणि एकंदर रूप तसं असावं लागतं. मी तंदुरुस्त आणि सुदृढ शरीरयष्टीबद्दल नेहमीच जागरूक असतो. त्यामुळे अशा चित्रपटांमध्ये मी समाविष्ट होऊ शकतो, असं मला वाटतं. असं असलं, तरी मला बाइक चालविणं सर्वात अधिक आवडतं. त्यामुळे ज्या चित्रपटात बाइकवरून पाठलाग करण्यासारखे प्रसंग असतात, अशा चित्रपटांना मी तात्काळ होकार देतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in