ज्युनियर मिस इंडिया स्पर्धा मुलांसाठी एक उत्तम मंच; अमृता फडणवीस यांचे गौरवोद्गार

या फिनालेमध्ये टीव्ही आणि जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या स्पर्धकांना देखील विशेष पुरस्कार देण्यात आले.
ज्युनियर मिस इंडिया स्पर्धा मुलांसाठी एक उत्तम मंच; अमृता फडणवीस यांचे गौरवोद्गार

मुंबई : किड्स फॅशन इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित आणि बहुप्रतिक्षित फॅशन इव्हेंट 'ज्युनियर मिस इंडिया २०२४' चा ग्रँड फिनाले - सीजन २ मोठ्या दिमाखात वीरा देसाई रोड येथील कंट्री क्लबच्या प्रांगणात पार पडला. २० राज्यांतील ४५ शहरांमधून आलेल्या ४ ते १५ वयोगटांतील हजारों स्पर्धकांपैकी निवडलेले १२० स्पर्धक या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाले होते.

ज्युनियर मिस इंडिया ग्रँड फिनालेच्या सीजन टू मधील स्पर्धक मुली या ४ते ६, ७ ते ९, १० ते १२ आणि १३ ते १५ या वयोगटांमध्ये विभागले गेले होते. यातील ४ ते ६ वयोगटामध्ये यक्षिता शर्मा ही विजेती ठरली. तर अनिरा विश्वकर्मा ही पहिली उपविजेती आणि इयाना वालिया ही दुसरी उपविजेती ठरली आहे. ७ ते ९ वयोगटामध्ये संज्युक्ता श्याम तुंगखांगला विजेती घोषित करण्यात आले. तर प्रणिका सागर उपरकर आणि राव्या रोहन या संयुक्त रीतीने पहिल्या उपविजेत्या ठरल्या आणि सियाल जैनला दुसरे उपविजेतेपद मिळाले. १० ते १२ वयोगटामध्ये सिरजन कौर गिलला स्पर्धेचे विजेतेपद, शरयू पाटीलला पहिले उपविजेतेपद आणि आराध्या रेड्डीला दुसरे उपविजेतेपद मिळाले. १३ ते १५ वयोगटामध्ये पावी या मुलीला विजेतेपद मिळाले. तर समृद्धी बासूला पहिले उपविजेतेपद मिळाले. तसेच शताक्षी श्रीवास्तव आणि शिया सपालीगा यांना संयुक्तरित्या दुसरे उपविजेतेपद मिळाले.

या फिनालेमध्ये टीव्ही आणि जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या स्पर्धकांना देखील विशेष पुरस्कार देण्यात आले. माय सिटी इव्हेंट्स इंडिया कॉर्पोरेशनतर्फे आयोजित या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री, गायिका आणि बँकर अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तसेच या ग्रँड फिनालेमध्ये सेलिब्रेटी जज म्हणून सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन, अभिनेता विपुल रॉय, सौंदर्य तज्ज्ञ उन्नती सिंग, मिस युनिव्हर्स नोयोनीता लोध, प्रसिद्ध उद्योजक, कलाकार आणि क्युरेटर जलपा विठ्लानी, कास्टिंग समन्वयक शोभा गोरी आणि माय सिटी इव्हेंट्स इंडिया कॉर्पोरेशनच्या सीईओ मृदुला सोनी उपस्थित होत्या.

लहान वयापासूनच मुलींना समाजामध्ये निर्भीडपणे वावरण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी आणि स्वतःकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देण्यासाठी ज्युनियर मिस इंडिया २०२४ सारखी स्पर्धा एक उत्तम मंच आहे. महिला सशक्तीकरण ही काळाची गरज आहे, असे आपल्याला नेहमी ऐकायला मिळते, पण खऱ्या अर्थाने लहान वयामध्येच मुलींना मानसिक दृष्ट्या सशक्त बनवून त्यांच्यातील सुप्त कलागुण बाहेर काढून, त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणजे हा मंच आहे. या स्पर्धेतील प्रत्येक मुलींमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे आणि या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धक ही विजेती आहे.

- अमृता फडणवीस

ज्युनियर मिस इंडिया' मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे. स्पर्धेची तयारी करताना त्यांना मॉडेलिंग, रॅम्प वॉक, संवाद कौशल्य, नृत्य, अभिनय, भाषा आदेश, वर्तन नियंत्रण, वैयक्तिक ग्रूमिंग आणि व्यक्तिमत्व विकास यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. स्पर्धकांना चित्रपट अभिनेते, मॉडेल्स आणि फॅशन इंडस्ट्रीतील व्यक्तिमत्त्वांकडून प्रशिक्षण दिले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धक मूलीची आम्ही आपल्या मुलीप्रमाणे काळजी घेतो. त्यांच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही.

-सरबजीत सिंग, संचालक माय सिटी इव्हेंट्स इंडिया कॉर्पोरेशन

logo
marathi.freepressjournal.in