मुंबई : भाजप खासदार कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या `इमर्जन्सी` चित्रपटातील सेंसॉर बोर्डाने सुचविलेली दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यास आपण तयार आहोत, असे चित्रपटाचे सहनिर्माती कंपनी झी इंटरटेंमेंटने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यामुळे या चित्रपटाला लवकरच सेंसॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
इमर्जन्सी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवत सेंसॉर बोर्डाने ही दृश्ये काढून टाकण्यास सांगितले होते. प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला निर्देश द्या, अशी मागणी करत सहनिर्माता झी इंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्या़ फिरदोस पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी निर्मात्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील शरण जगतियानी यांनी, न्यायालयाला सदर दृश्ये काढून टाकण्यास निर्माते तयार असल्याचे सांगितले.
प्रमाणपत्र दोन आठवड्यात
सेंसॉर बोर्डाने सूचविलेली दृश्ये चित्रपटातून काढून नवीन प्रिंट ही सेंसॉर बोर्डाला परीक्षणासाठी निर्मात्यांकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केली जाईल, असे जगितयानी यांनी न्यायालयाला सांगितले. यावर, सुधारित चित्रपटाचे परीक्षण केल्यानंतर सेंसॉर बोर्ड चित्रपट प्रदर्शनाचे प्रमाणपत्र दोन आठवड्यामध्ये देईल, असे सेंसॉर बोर्डाचे ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले.
ॲड. शरण जगतियानी यांनी सीबीएफससीने कंगनाला सुधारित बदलांबद्दल माहिती दिली. कंगना आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात या विषयावर चर्चा झाली असून तशी तयारी दर्शविण्यात आली आली आहे. झी एंटरटेनमेंटला दृश्ये वगळण्यासाठी वेळ लागेल. दृश्ये हटवण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम चित्रपटाच्या वेळेवर होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जाईल, अशी हमी न्यायालयात देताना सेन्सॉर बोर्डाने सुचवले होते, त्यानुसार बदल करण्यात येणार असल्याने चित्रपटाला लवकरच युए प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. याची दखल घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली.