IPS अधिकाऱ्याच्या सावत्र मुलीला एअरपोर्टवरुन अटक, DRI ने अभिनेत्रीला १४.८ किलो सोन्याची तस्करी करताना पकडले

अभिनेत्रीचा सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू असल्यामुळे पोलिस तिच्यावर नजर ठेवून होते. ती १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास करून आली होती. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला होता.
IPS अधिकाऱ्याच्या सावत्र मुलीला एअरपोर्टवरुन अटक, DRI ने अभिनेत्रीला १४.८ किलो सोन्याची तस्करी करताना पकडले
Published on

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तिच्याकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. सोमवारी रात्री तिला अटक करून इकोनॉमिक ऑफेन्स कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, अभिनेत्री रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बेंगळुरू विमानतळावर आली होती. सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू असल्यामुळे पोलिस तिच्यावर नजर ठेवून होते. पोलिसांना संशय आल्याने तिची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात सोने सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार, रान्या राव सोने तस्करी करत होती. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. रान्या रावने मोठ्या प्रमाणात सोने परिधान केले होते आणि सोन्याच्या काही विटा आपल्या कपड्यांमध्ये लपवून तस्करी करीत होती.

१५ दिवसांत ४ वेळा दुबईला

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री रान्या राव गेल्या १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास करून आली होती. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय बळावला. यानंतर, सोमवारी रात्री तिला प्रथम तपासणीसाठी आणि नंतर चौकशीसाठी रोखण्यात आले. तपासादरम्यान, तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले.

एअरपोर्टवर सुरक्षा यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री रान्या रावने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे, तर एका कॉन्स्टेबलने तिला कोणतीही सुरक्षा तपासणी न करता विमानतळाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. तपास अधिकारी आता या दाव्याची सत्यता पडताळत असून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती होती किंवा कोणी तिला मदत केली का, याचा शोध घेत आहेत.

DRI मुख्यालयात चौकशी; मोठे तस्करी नेटवर्क?

अटक केल्यानंतर रान्या रावला बेंगळुरूच्या HBR लेआउटमधील DRI मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. अधिकाऱ्यांकडून ती एकटी तस्करी करीत होती की की दुबई आणि भारतामधील मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग आहे, याची सखोल तपासणी सुरू आहे.

कोण आहे रान्या राव?

रान्या राव ही कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने २०१४ मध्ये 'माणिक्य' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात ती कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत झळकली होती. मात्र, पहिल्या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात ती अपयशी ठरली. आतापर्यंतच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने फक्त ३ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in