Gaurav Kashide: गौरव काशिदे या अवघ्या २६ वर्षाच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा २३ जून रोजी मृत्यू झाला आहे. १० जूनला त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याचा अपघात झाला होता. गौरवला वाकोला पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या एका खासगी बसला धडक दिली. त्यानंतर त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली,अखेरीस आयसीयूमध्ये १० दिवस संघर्ष करत असलेल्या गौरवचा मृत्यू झाला. गौरव 'गुन्ह्याला माफी नाही' या मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करत होता. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेसाठीही त्याने काम केले होते.
जुई गडकरीची पोस्ट चर्चेत
छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग'. या मालिकेत काम करणाऱ्या जुई गडकरीने काहीच दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तिने तिच्या मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाल्याचे सांगितले होते.
तिने लिहले होते की, "अगदी काल परवा पर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरच होतं ना… मला वर्षानु वर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा… पण निदान त्या मुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा… घरी ऊशीरा जात असाल पण सुखरुप पोहचत होता!
मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणारं घरी कोणी नाही… पण तुमची वाट बघणारे आहेत… काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा… पावसाळा येतोय… पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात.. तर स्वताःची आणि ईतरांची पण काळजी घ्या.
-तुमचाच (लाडका) रस्ता!
गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघुन डोकं सुन्नं झालंय… त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे… तो गेले ७-८ दिवस कोमात आहे.. प्लिज गाड्या हळु चालवा "
गौरव सोबत काम केलेल्या अभिनेत्री मानव नाईकनेही पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे.
गौरवच्या निधनामुळे मनोरंजन इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.