
मुंबई : ऐतिहासिक संदर्भावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन रखडण्याची चिन्हे आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिलेल्या स्थगिती आदेशात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यापूर्वी याचिकाकर्ते आणि चित्रपट निर्मात्यांना बाजू मांडण्याची संधी द्या, असे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले.
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या शीर्षकाबरोबरच त्यातील ऐतिहासिक संदर्भांना आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. याची दखल घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करून प्रदर्शनच थांबवण्याची विनंती केली.