
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या बळावर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'जवान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये शुटिंगदरम्यान शाहरुखला दुखापत झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने शाहरुखवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाररुख खान लॉस एंजलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता. शुटिंगदरम्यान त्याच्या नाकाला दुखापत झाली. यावेळी त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यानंतर शाहरुखाला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो थांबवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचं सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर शाहरुख भारतात परतला असून झालेल्या दुखापतीतून सावरत आहे.
शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटाने सर्वत्र खळबळ उडवून देत जगभरात १ हजार कोटींची कमाई केली होती. आता शाहरुखच्या बहुचर्चीत 'जवान' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होतं असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.