'कोण होणार करोडपती' आता देणार २ कोटी

सचिन खेडेकर यांच्यासोबत सेटवर रंगली पत्रकार परिषद
 'कोण होणार करोडपती' आता देणार २ कोटी

आता मागे नाही राहायचं असं सांगत 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी आता एक नाही तर तब्बल 2 करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे. 'कोण होणार करोडपती'चा येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या उत्कंठावर्धक खेळाबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच दिलखुलास आणि बहारदार सूत्रसंचालन हे देखील प्रमुख आकर्षण आहे. खेडेकरांची स्पर्धकांना आपलेसे करून बोलते करण्याची पद्धत आणि त्यांचं प्रभावी संवाद कौशल्य प्रेक्षकांचं मनं जिंकून जातं. कधी भावूक करणारे क्षण तर कधी प्रेरणा देणारे किस्से हे देखील नेहमीच या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. 'कोण होणार करोडपती' मध्ये समाजातील विविध सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांचा सहभाग असतो.

या वेळी बोलताना 'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालक, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, 'आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्याफार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो, तेव्हा मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बरं चाललंय ना, अशी माझीही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं. मला नेहमी वाटतं की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करून आलेलेच असतात, पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर.'

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in