

मराठी शाळेच्या अस्मितेला नव्या सुरात सादर करणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालून गेला. महाराष्ट्रभर चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावर आणि बुक माय शोवरही चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने तब्बल ३.९१ कोटींचा गल्ला कमावला आहे, आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक शहरांमध्ये हाऊसफुल होत असून, प्रेक्षक भावनिक क्षणांमध्ये रमून बाहेर पडताना दिसत आहेत. आशय, संवाद, वास्तववादी मांडणी आणि भावनिक गाभा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांशी थेट नाळ जोडतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे.
कथेची प्रभावी मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ सिनेमा न राहता एक अनुभव बनला आहे. समीक्षकांकडूनही भरभरून दाद मिळाली असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून गेले आहेत. “प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी अत्यंत आनंदित आहे. संवेदनशील विषय प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, हेच मोठे समाधान,” असे ते म्हणतात.
चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांसारखी दमदार स्टारकास्ट आहे. लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग निर्माती आहेत. सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.