'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'चा ट्रेलर लाँच; जिथे चित्रीकरण झालं, तिथेच पार पडला अनोखा सोहळा

मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक आणि भावनिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील ज्या मराठी शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला.
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'चा ट्रेलर लाँच; जिथे चित्रीकरण झालं, तिथेच पार पडला  अनोखा सोहळा
Published on

मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक आणि भावनिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील ज्या मराठी शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि शाळेचे पटांगण साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा शालेय आठवणींना उजाळा दिला.

बंद होत असलेल्या मराठी शाळेची हृदयस्पर्शी कथा

‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटात बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या एका मराठी शाळेची कथा मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, शाळा बंद होण्याच्या टप्प्यावर असताना अनेक वर्षांनंतर त्या शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येतात आणि आपल्या शाळेला वाचवण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहतात. या पुनर्भेटीत शालेय आयुष्यातील खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, शिक्षा, दंगा-मस्ती आणि निरागस क्षण पुन्हा जिवंत होतात. नॉस्टॅल्जियाने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडतो.

“मराठी शाळा ही वास्तवातील चिंता” – दिग्दर्शक हेमंत ढोमे

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “महाराष्ट्रात मराठी शाळांची संख्या कमी होत जाणं ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही एक मजेशीर, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शाळेत चित्रीकरण केलं, तिथेच ट्रेलर लाँच करणं हा आमच्यासाठी खास अनुभव होता. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना त्यांच्या शाळेची आठवण येईल आणि मराठी शाळेचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होईल.”

दमदार कलाकारांची फौज

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकांच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. ट्रेलरमधील आणखी एक सरप्राइज म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत देखील एका विशेष भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

आठवणी, गाणी आणि शाळेची सैर

ट्रेलर लाँच सोहळा म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हता, तर शाळेच्या आठवणींचं गोड रियुनियन ठरलं. कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्यांच्या ‘नाच रे मोरा’ या नृत्याने झाली. त्यानंतर रोहित जाधवने गायलेलं ‘शाळा मराठी माझी’ गाणं ऐकताना उपस्थित क्षणभर आपल्या शालेय दिवसांत हरवून गेले. कलाकारांनी ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्यावर थिरकत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या शेवटी सचिन खेडेकर यांनी सर्वांना शाळेची सैर घडवत प्रत्येक वर्ग आणि कोपऱ्यातील आठवणींना उजाळा दिला.

मराठी शाळांसाठी भावनिक आवाहन

चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत. ट्रेलर लाँचच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाळा, आठवणी, मराठी भाषा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट मराठी शाळांबाबतची चर्चा नव्याने सुरू करणार, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in