काही दिवसांपूर्वी 'रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग ही चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे तिने शेअर केलं आहे.
हा चित्रपट चित्रपटगृहात चांगलीच कामगिरी करताना दिसत आहे. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग हिने या चित्रपटात रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. तिचे रणवीर आणि आलिया बरोबर खूप सीन्स आहेत. कलाकार म्हणून ते कसे आहेत? हे आता तिने नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
ती म्हणाली, "रणवीर हा खूप मोठा फेमस असा स्टार आहे. मी असं अनेक कलाकारांच्या बाबतीत पाहिलं आहे. जे इतके मोठे स्टार्सही नाहीत त्यांचे मी पाहिले आहे की, कधी कधी असं होतं की तो सीन समोरच्या व्यक्तीचा आहे. तो सीन आपला नसतो. पण रणवीर हा खूपच समजूतदार अभिनेता आहे. त्याला नेहमी माहित असतं की, हा समोरच्या कलाकाराचा सीन आहे आणि या मध्ये आपल्याला एक पाऊल मागे घ्यायचं आहे. तो कॉ-ऍक्टर म्हणून जितका चांगला आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही खूप चांगला आहे. रणवीर आणि आलियाच्या बाबतीतही मला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, ते फक्त स्वतःचं काम बघत नाहीत. तर ते सीनचा देखील विचार करतात. मी स्टार आहे. त्यामुळे सीनमध्ये मीच झळकणार, असं त्या दोघांच्या बाबतीत मला एक टक्का ही कधी वाटलं नाही", असं क्षिती जोग म्हणाली. क्षिती जोगचं काम सगळ्यांना खूप आवडलं असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे.