१८ नोव्हेंबर रोजी रात्री अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'बेबी तबस्सुम' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला. छोट्या पडद्यावर रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविलचे भाऊ विजय गोविल यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.
एका वृत्तपात्राशी बोलताना तबस्सुम यांचा मुलगा 'होशांग गोविल' यांनी असे सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी आईने अखेरचा श्वास घेतला. 'त्या पूर्णपणे बऱ्या होत्या. आम्ही १० दिवसांपूर्वीच आमच्या शोचे शूटिंग केले होते, पुढेही पुन्हा शूटिंग होणार होते. होशांग यांनी पुढे असे म्हटले की, त्यांना गॅस्ट्रोची समस्या होती. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, डिस्चार्जही मिळाला होता मात्र काल पुन्हा त्यांना भरती करण्यात आले. दोन मिनिटांमध्ये त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अशी होती तबस्सुम यांची कारकीर्द...
तबस्सुमने १९४७मध्ये बेबी तबस्सुम नावाने 'नर्गिस' या हिंदी चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. ७० च्या दशकात त्यांनी एक यशस्वी टेलिव्हिजन होस्ट म्हणून आपला ठसा उमटवला. दूरदर्शनवर २१ वर्षे चाललेल्या 'फूल खिले है गुलशन गुलशन' या टॉक शोमध्ये त्यांनी अनेक बड्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. हा शो १९७२मध्ये सुरू झाला आणि १९९३ पर्यंत चालला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आपल्या यूट्यूब चॅनलसाठी सतत व्हिडिओ बनवत होत्या.