आशा पारेख, शिवाजी साटम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

आशा पारेख, शिवाजी साटम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन २०२३ साठीचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे.
Published on

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन २०२३ साठीचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रूपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रूपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रूपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रूपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

पुरस्कार वितरण सोहळा २१ ऑगस्टला

हा पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता एनएससीआय डोम, वरळी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in