Raghu 350 Teaser: बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऍक्शन आणि रोमान्सची जोड असलेल्या 'रघु ३५०' चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांना वेडं केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. पोस्टर पाहिल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी रघु ३५० चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार असा मोठा प्रश्न टिझर पाहून पडला आहे. अल्पावधीतीच या टीझरला प्रेक्षकांच्या भरघोस पाठिंबा मिळाला आहे. येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?
समोर आलेल्या टीझरमध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते आणि अदिती कांबळे यांचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणांना त्यांचं प्रेम मिळणार का?, याची उत्सुकता टीझर पाहून वाढली आहे. चिन्मय, विजय, अदिती या कलाकारांसह या चित्रपटात तानाजी गलगुंडे, संजय खापरे, शिवराज वाळवेकर, मिलिंद दास्ताने, रोहित आवळे, महिमा वाघमोडे, भरत शिंदे, रामभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.
निर्माते आणि दिग्दर्शक
'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच करण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पेलली आहे. तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे.
रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे 'रघु ३५०' मधून लवकरच समजेल. चित्रपटात प्रेमाचे बंध फुलणार की फक्त राडा होणार हे ६ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.