
'मुंबई सुरक्षित नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही', अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणानंतर दिली आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज पहाटे अज्ञात व्यक्तीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेवर बॉलीवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेत्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा पूर्व नियोजित कटाचा भाग असू शकतो, असे एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
अभिनेत्री कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सैफ अली खानवरील हल्ल्याविषयी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, या संदर्भात पोलिसांनी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. हा कोणत्या प्रकारचा हल्ला आहे. कोणत्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला, सर्व गोष्टी तुमच्या समोर पोलिसांनी मांडल्या आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.
मुंबई अतिशय सुरक्षित
यावेळी मुंबईच्या सुरक्षेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील महानगरांपैकी मुंबई ही अतिशय सुरक्षित आहे. हे खरे आहे की कधी-कधी काही घटना घडतात त्याला गंभीरपणे घेतले पाहिजे. पण केवळ त्या घटनेमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणे या करता योग्य होणार नाही कारण याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहायला पाहिजे यादृष्टीने देखील सरकार प्रयत्न करेल, असेही फडणवीसांनी सांगितले.
सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी 'लेटेस्ट अपडेट'
"सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात तो जबर जखमी झाला होता. त्याला त्याच्या मोठ्या मुलाने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली होती. मणक्यात चाकूचे टोक अडकल्याने चाकू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला झालेल्या जखमा आणि त्याच्या मानेवर झालेल्या जखमा प्लॅस्टिक सर्जरी टीमने दुरुस्त केल्या असून तो आता बरा झाला आहे आणि प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे'', असे लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.
आणीबाणीच्या काळातील इतिहास लोकांना कळायला हवा
यावेळी बोलताना फडणवीस यांनी कंगना राणावत यांच्या 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटाचे कौतुक केले. आणिबाणीच्या काळातील घटना अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. तसेच इंदिराजींच्या काळातील चांगल्या घटना देखील चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. तसेच इंदिरा गांधी यांच्या काळात लादल्या गेलेल्या आणीबाणीचा इतिहास लोकांना कळायला हवा, असेही ते म्हणाले. अनेक वादातून गेलेला हा कंगनाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट अखेर उद्या (दि. 17) सिनेमाघरात झळकणार आहे.