'चंद्रमुखी' बाबत मानसी नाईकने मांडलं मत ; म्हणाली, "माझी खिल्ली..."

'चंद्रमुखी' हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. यात अमृता खानविलकर या अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र...
'चंद्रमुखी' बाबत मानसी नाईकने मांडलं मत ; म्हणाली, "माझी खिल्ली..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखलं जातं. मानसी फक्त कलाकार नाही तर ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. मानसी नाईक ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या डान्सची आणि अभिनयाची झलक ती इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून शेअर करत असते. मानसी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटामुळे मानसी प्रचंड चर्चेत आली होती. 'चंद्रमुखी' चित्रपटातील मुख्य भूमिका कोण साकारणार? कोणाला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती? हे सगळे प्रश्न प्रेक्षकांना पडले होते.

'चंद्रमुखी' हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. यात अमृता खानविलकर या अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, एका मुलाखतीत मानसीने 'चंद्रमुखी' चित्रपटासाठी तिला आधी विचारण्यात आलं असल्याचं सांगितलं. यानंतर निर्माण झालेल्या वादावर अलीकडेच मानसी नाईकने भार्गवी चिरमुलेच्या 'गप्पा मस्ती' या पॉडकास्टमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं. अभिनेत्री मानसी नाईक म्हणाली की, "मी कधीच 'चंद्रमुखी' नव्हते. या सगळ्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मी स्टोरी सुद्धा सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या कलाकारांशी याबाबत मी फोनवर सुद्धा बोलले होते".

मानसी पुढे म्हणाली की, "संपूर्ण गोष्ट सांगायची झाली तर, जेव्हा विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा चित्रपट बनवला जाणार अशी चर्चा झाली होती. तेव्हा मी 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमात जज म्हणून काम पाहत होते. त्यावेळी मी, विश्वास सर आणि सुबोध सर असे आम्ही तिघेजण बोलत असताना 'चंद्रमुखी' चा विषय सुरु होता. त्यावेळी सुबोध भावे सर 'चंद्रमुखी'चं दिग्दर्शन करणार होते. त्यावेळी ते म्हणाले होते, 'माझी चंद्रमुखी तू!' हा सगळा विषय मी एका मुलाखतीमध्ये कोणाचंही नाव न घेता सांगितला होता आणि हे सगळं ऐकून एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपटाची टीम बदलली. मी आज स्पष्टचं सांगते की, मला प्रसाद ओक किंवा प्लॅनेट मराठीने कधीच 'चंद्रमुखी' साठी विचारणा केली नव्हती. हा विषय फार जुना होता, तेव्हा दिग्दर्शक-निर्माते सगळेच वेगळे होते."

'चंद्रमुखी'च्या संपूर्ण टीमने माझं नाव घेऊन माझी प्रचंड खिल्ली उडवली होती. त्यावेळी मला फार वाईट वाटलं होतं. ज्या व्यक्तीने ही खिल्ली उडवली होती. त्या व्यक्तीने माझ्यासोबत काम देखील केलं होतं. त्या व्यक्तीने मला स्वत: हा सगळा प्रकार विचारण्यासाठी फोन केला होता आणि मला ती फोनवरती खूप बोलली..मला अतिशय वाईट वाटलं. मी तिची खूप मोठी चाहती होते, त्या दिवशी तिने तिची एक चाहती गमावली…मी त्या व्यक्तीचं आता नाव घेणार नाही", असं मानसी नाईकने सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in