ऐतिहासिक भूमिकेत मनवा नाईक ; शिवप्रताप गरुड़झेप चित्रपटात साकारणार सोयराबाईंची भूमिका

'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
ऐतिहासिक भूमिकेत मनवा नाईक ; शिवप्रताप गरुड़झेप चित्रपटात साकारणार सोयराबाईंची भूमिका

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईक हिने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘शिवप्रताप गरुड़झेप’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला 'शिवप्रताप गरुडझेप' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बऱ्याच कालावधीनंतर तेसुद्धा ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते, असं मनवा सांगते. अत्यंत रूपवान आणि लावण्यवती असणाऱ्या सोयराबाई यांची भूमिका करायला मिळणं माझ्यासाठी ही महत्तवपूर्ण होतं. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.

आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती, साहस व दूरदृष्टी यांच्या जोरावर महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजीची नजरकैदेतून सुटका करून घेतली. आग्रा येथून यशस्वीपणे निसटून दख्खनमध्ये रायगड येथे येण्यात महाराजांनी यश मिळविले. शिवचरित्रातील ही तेजस्वी यशोगाथा शिवप्रताप गरुड़झेप या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरला 'शिवप्रताप गरुडझेप' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in