मुंबई : पावसाळा सुरु झाल्यापासून सामान्य माणसांप्रमाणेच चित्रपट तसेच मालिका सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाणे शहरातील वाहतूक कोंडीला समोरं जावं लागत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत यापूर्वी सुद्धा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. आता मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर?
मुंबई ठाणे येथील अनेक कलाकार दररोज ठाण्यातील घोडबंदर रोडवरून प्रवास करत असतात. अनेकदा त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. मंगळवारी पुन्हा एकदा ठाण्यातील घोडबंदर रोडवरून शूटिंगसाठी जात असताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याविषयी त्यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आपली बाजू मांडली. ऐश्वर्या म्हणाल्या, 'काय करायचं आता या घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकचं, आता मी याच्या प्रेमातच पडायला लागले आहे'.
पुढे ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 'रस्ता न होण्यामागे आणि वाहतूक कोंडी असण्यामागे प्रत्येकाची बाजू असेल. कधी सरकारची बाजू असेल, राजकारण्यांची बाजू असेल याशिवाय कंत्राटदार आणि त्या रस्त्यासाठी काम करणाऱ्या कामगारांची बाजू असेल. पाऊस, वातावरण सगळ्याच गोष्टी आपण मान्य केल्या तरी… आता आपली बाजू समजून घेण्याची वेळ आली आहे. पैसा, वेळ, एनर्जी, वेळेत पोहोचण्याचं टेन्शन या सगळ्यासाठी आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे'.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मागील अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर सुद्धा त्यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली या खलनायिकेची भूमिका साकारत असून त्या लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार अशी माहिती मिळत आहे.