मराठी अल्बममधील पहिले ऐतिहासिक प्रेमगीत ठरलं 'पिरतीचं याड'

प्रसिद्ध संगीतकार 'प्रशांत नाकती' घेऊन आला आहे एका शूरवीराची ऐतिहासिक प्रेमकहाणी, 'नादखुळा म्युझिक'वर 'पिरतीचं याड' गाणं प्रदर्शित
मराठी अल्बममधील पहिले ऐतिहासिक प्रेमगीत ठरलं 'पिरतीचं याड'
Published on

मिलीनीयर प्रशांत नाकती नवनवीन मराठी अल्बम गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. यावेळेस 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक शिवकालीन ऐतिहासिक असे 'पिरतीचं याड' गाणे प्रदर्शित झाले. मराठी अल्बम गाण्यांमधील हे पहिलेच गाणे आहे जे ऐतिहासिक काळावर भाष्य करणारे आहे. शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असे हे सुवर्णकाळातले सुंदर गाणे प्रदर्शित झाले. याशिवाय अवघ्या काही सेकंदातच सोशल मीडियावर गाणे तुफान व्हायरल होत आहे.

या गाण्यात प्रशांतने ऐतिहासिक काळातील पती पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारी कलाकृती रेखाटली आहे. त्यामुळे ही आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'पिरतीचं याड' या गाण्याचे संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केले आहे. या गाण्याचे गीतकार प्रशांत नाकती आणि गणेश व्हटकर आहेत. तर गायक रविंद्र खोमणे आणि गायिका सोनाली सोनावणेने हे गाणे गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन अभिजीत दाणी यांनी केले आहे. या गाण्यात अभिनेता विशाल फाले आणि अभिनेत्री तृप्ती राणे हे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र 'पिरतीचं याड' गाण्याच्या रील्स व्हिडिओची चर्चा आहे.

'पिरतीचं याड' या गाण्याविषयी प्रशांत नाकतीने सांगतिले की, "आपलीच हवा, मी सिंगल, आपली यारी या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर आम्ही एक ऐतिहासिक प्रेमकहाणी तुमच्यासाठी घेऊन यायची आमची इच्छा या गाण्याच्या स्वरूपात पूर्ण झाली. इतिहासातील एका मावळ्याचे जोडपे आहे. जे आपल्या मायभूमीसाठी लढले आहेत. त्यांचे आयुष्य खडतर होतं, तसेच त्यांच्या कुटुंबाशी असलेले नाते यात मांडले आहे. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा या गाण्यात दिसून येतो. आपल्या मायभूमीसाठी केलेला लढा, त्याग, समर्पण आणि प्रेम याचे संदेश देणारे हे गाणे आहे"

पुढे तो म्हणाला की, "आम्ही मुबलकश्या पैशात आणि खूप कमी वेळेत फक्त मेहनतीच्या जोरावर या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यात व्हीएफएक्सचा वापर केला आहे. आम्हाला शिवकालीन वाडा तयार करायला तीन दिवस लागले. २०२३ या नववर्षाची सुरुवात आम्ही 'पिरतीचं याड' या गाण्याने करत आहोत. माझ्या सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो की त्यांनी नादखुळा म्युझिक आणि 'पिरतीचं याड' या गाण्यावर भरभरून प्रेम केलं. तुमचं असचं प्रेम कायम राहू देत."

logo
marathi.freepressjournal.in