इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचीत आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'रावरंभा’ चित्रपटातून येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते निर्माते-शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. रावरंभाच्या चित्रपटाच्या निमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे, अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री मोनालीसा बागल यांनी नवशक्तिच्या कार्यालयाला भेट दिली.
हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट खचितच आपल्याला माहित असते. कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन् त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'मुळशी पॅटर्न'च्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल यांची जोडी 'रावरंभा' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, "इतिहासाच्या पानांमध्ये 'रावरंभा' ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला आहे."
ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत. ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव, तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे.
वेगवेगळ्या भूमिका मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं
अभिनेता संतोष जुवेकर आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळ्या धाटणीची ही भूमिका आहे. या भूमिकेबद्दल संतोष जुवेकर याने सांगितले की, ‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. नकारात्मक किनार असलेली ही भूमिका असून, मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल, असा मला विश्वास आहे.'
कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'रावरंभा' हा सिनेमा येत्या १२ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहे.