गुण्या गोविंदाने नांदण्याची परिभाषा सांगणारा... कुणी गोविंद घ्या...?

दीपेश सावंत लिखित आणि दिग्दर्शित 'कुणी गोविंद घ्या...?' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १७ मार्चला ठाण्यातील गडाकरीमध्ये होणार
गुण्या गोविंदाने नांदण्याची परिभाषा सांगणारा... कुणी गोविंद घ्या...?

१७ मार्चला मराठी रंगभूमीवर 'कुणी गोविंद घ्या...?' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला. अनेक प्रेक्षकांनी या नाटकाला पसंती दर्शवली. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन दीपेश सावंत यांनी केले आहे. प्रसाद रावराणे, सिद्धेश नलावडे आणि विभूती सावंत अशी तरुण कलाकारांची फळी या नाटकात दिसणार आहे. यशवंत क्रिएशन आणि अर्चना थिएटर्स यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. रॉबिन लोपेज व राम सगरे यांचे नेपथ्य, संकेत शेटगे यांचे संगीत व शिवाजी शिंदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. उदयराज तांगडी हे निर्मिती प्रमुख असून नाटकाचे निर्माते म्हणून मोनाली तांगडी, शेखर दाते व दुर्वा सावंत हे जबाबदारी सांभाळत आहेत.

आजकाल आपल्या प्रत्येक नात्यामध्ये संवादाचा अभाव पाहायला मिळतो. अनेकदा आपण नात्यांमध्ये एकमेकांना गृहीत धरतो. स्वतःच वेगवेगळ्या कल्पना करून घेतो. पण एकमेकांशी बोलण्याने, तसेच आपण आपले मत शांतपणे मांडले तर समस्या नक्कीच सुटतात, असा विचार या नाटकामध्ये मांडण्यात आला आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन दीपेश सावंत यांनी केले आहे. ते या नाटकाबद्दल म्हणाले की, "बऱ्याचदा आपण पाहतो की आजकाल प्रत्येक नात्यांमध्ये संवाद हा खूप कमी झाला आहे. एकमेकांशी बोलणं कमी होत, आणि यामुळे आपण एकमेकांना गृहीत धरून बसतो आणि गैरसमज निर्माण करून घेतो. मी हे नाटक यासाठी लिहिले कारण, जर तो मुद्दा वेळच्यावेळी आपण संधीत व्यक्तीशी बोललो असतो तर पुढे काही प्रॉब्लेमच येणार नाहीत. सध्याच्या घडीला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला हे लिहावंसं आणि याचा नाटक करावंस वाटलं. हे नाटक विनोदी तर आहेच, पण नकळतपणे या नाटकातून एक महत्त्वाचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."

ते पुढे म्हणाले की, "राहिला प्रश्न लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिका एकत्र सांभाळण्याचा तर एक लेखक म्हणून मला खूप जास्त हात आखडता घ्यावा लागला. कारण हे नाटक खूप मोठे होते, पण एका आतल्या दिग्दर्शकामुळे माझे अनेक मोह मी टाळले आहे. पण प्रेक्षक म्हणून हे नाटक तुम्ही एन्जॉय कराल हे नक्की." या नाटकाचे निर्मिती प्रमुख उदयराज तांगडी म्हणाले की, "गेली १०-१२ वर्षे झाले, आम्ही हे नाटक करायचे असे आमचे विचार होते. पण काही अडचणींमुळे हे नाटक थोडं उशिरा रंगभूमीवर आलं. पण या नाटकाचा विषय थोडा वेगळा आहे. कारण, हे नाटक म्हणजे नवरा बायकोच्या नात्यांमधील काही अडचणी वेगळ्या पद्धतीने समोर मांडणारे आहे. त्यामुळे हे वेगळ्या धाटणीचे नाटक आहे आणि हे प्रेक्षकांनाही बघायला नक्की आवडेल."

तसेच, अभिनेते प्रसाद रावराणे म्हणाले की, "हे नाटक तीन पात्रांचे आहे, आणि माझी भूमिका ही सरळसाधी आहे. कुठेही तत्वज्ञान न झाडता मिश्कीलपणे मेसेज देऊन जाणारा आहे. आज प्रत्येक नात्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे संवाद. हे असं का आहे? हे उत्तर मिळवण्यासाठी हे नाटक नक्की पाहायला या." यामध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विभूती सावंत म्हणाल्या की, "या नाटकांमध्ये जी माझी भूमिका आहे, ती खूप टिपिकल असली तरी तिच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत. त्यामुळे मला ही भूमिका करायला आवडते." तसेच, अभिनेते सिद्धेश नलावडे म्हणाले की, "मी याआधी खूप नाटक आणि एकांकिकांमध्ये गावरान भूमिका केल्या आहेत. पण या नाटकामधली माझी भूमिका माझ्यासाठी थोडी वेगळी आहे. आणि ही भूमिका माझ्यासाठी अनेकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. पण आम्हीही एक कलाकार म्हणून जेवढं हे नाटक करताना मजा केली आहे, तेवढी मजा प्रेक्षकही करतील हे नक्की सांगेन."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in