महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्सने केली १८व्या आवृत्तीसाठी १० नाटकांच्या नामांकनांची घोषणा

'लावणी के रंग' आणि 'व्हाया सावरगाव खुर्द' हे मेटा २०२३च्या टॉप १० नाटकांमध्ये निवडले गेले
महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्सने केली १८व्या आवृत्तीसाठी १० नाटकांच्या नामांकनांची घोषणा

महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (META) ने १८व्या आवृत्तीसाठी १० नाटकांच्या नामांकनांची घोषणा केली. 'लावणी के रंग' आणि 'व्हाया सावरगाव खुर्द' हे मेटा २०२३च्या टॉप १० नाटकांमध्ये निवडले गेले आहेत. २३ मार्च ते २९ मार्च या कालावधीत महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (META) चालणार आहे. महिंद्रा समूहाने आयोजित केलेल्या महोत्सवाने १३ श्रेणींमध्ये नामांकित शीर्ष १० नाटकांची घोषणा केली. नवी दिल्लीतील कमानी सभागृह येथे २९ मार्चला भारतीय रंगभूमीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी साजरी करण्यासाठी विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.

META 2023 साठी मराठीतील २ नाटकांना नामांकित करण्यात आले आहे. यंधगये एक आहे मुंबईतील बी स्पॉट प्रोडक्शन निर्मित भूषण कोरगावकर दिग्दर्शित 'लावणी के रंग' आणि दुसरे आहे पुण्यातील आसक्त कलामंच निर्मित सुयोग देशपांडे दिग्दर्शित 'व्हाया सावरगाव खुर्द'. २०२३च्या पर्वासाठी महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, मणिपूर आणि राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशभरातून ३९५ प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सर्वसमावेशकता आणि विविधता एकत्रित करून अंतिम १० नामांकनांमध्ये आसामी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, मारवाडी आणि तमिळ यासारख्या भाषांमध्ये नाटके सादर केली जाणार आहेत.

मेटा सचिवालयासह निवड समितीने स्पर्धेसाठी सादर केलेली सर्व ३९५ नाटके पाहिली. या वर्षी समितीमध्ये नाटककार, लेखक आणि 'सीगल बुक्स'चे माजी मुख्य संपादक अंजुम कात्याल, अभिनेता, दिग्दर्शक आणि रंगमंच समीक्षक केवल अरोरा, पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना कुलकर्णी, थिएटर दिग्दर्शक शंकर वेंकटेश्वरन आणि नाटककार आणि नाट्यसमीक्षक विक्रम फुकन यांचा समावेश होता. या महोत्सवाबद्दल अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या की, "उत्तरेपासून ते भारताच्या पूर्वेपर्यंत मी आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक नाटके पाहिलेले नाहीत. या प्रकारची नाटके पाहणे हा सुंदर अनुभव होता. विशेषकरून या वर्षी हा महोत्सव देशाच्या विविधतेचा आणि सर्वसमावेशकतेचा उत्सव साजरा करत आहे. इथे तुम्हाला इतिहास, पौराणिक कथा, प्रायोगिक, महिला सक्षमीकरण, विनोदी आणि असे बऱ्याच गोष्टींचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. भारतातील रंगभूमी ही आपल्या देशाइतकीच वैविध्यपूर्ण आहे, जी स्वतःच एक बेंचमार्क आहे.”

logo
marathi.freepressjournal.in