Marathi Movie: 'मल्टिप्लेक्सवाल्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ' असं का म्हणाले अमेय खोपकर?

आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकवलेल्या 'गोदावरी', तर 'सनी' या चित्रपटांना (Marathi movie) मराठी प्रेक्षकांची तुफान गर्दी पण...
Marathi Movie: 'मल्टिप्लेक्सवाल्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ' असं का म्हणाले अमेय खोपकर?

११ नोव्हेंबरला मराठी चित्रपट 'गोदावरी' तर १८ नोव्हेंबरला 'सनी' हे मराठी चित्रपट (Marathi movie) प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे मराठी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चांगलीच गर्दी करत आहेत. असे असतानादेखील सोमवारी या दोन्ही चित्रपटांचे कमी शो लावल्याने पुन्हा एकदा मल्टिप्लेक्स मराठी चित्रपटांना डावलत असल्याची टीका सोशल माध्यमांतून करण्यात येत आहे. यावरून आता मनसे आक्रमक झाली असून मराठी चित्रपटांचे कमी केल्याने मल्टिप्लेक्सवाल्यांवर टीका केली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपरकर (Amey Khopkar) यांनी ट्विट करत, "मल्टिप्लेक्स चालकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे," असे म्हणत इशाराच दिला आहे.

"गोदावरी आणि सनी या दोन्ही चित्रपटांचे शो सोमवारी कमी झाले हे संतापजनक आणि दुर्देवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणं गरजेचं आहे. सनी चित्रपटाला किती गर्दी होतं आहे हे सोशल मीडियातील व्हिडिओंमधून स्पष्ट होतंय, असं असूनही मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करत आहेत. म्हणून त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आली आहे." असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.

सनी चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेदेखील टीका करत म्हंटले की, "पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होत आहे. या राज्यात मराठी चित्रपटासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावे लागत असेल तर कठीण आहे. शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय. लोक सनी या चित्रपटाची तिकीटे काढत आहेत आणि शोज रद्द केले जात आहेत. मराठी चित्रपटांसाठी कडक कायदा हवाच." अशी मागणी त्याने केली.

निखिल महाजन यांचे दिग्दर्शन आणि जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका केलेल्या 'गोदावरी'ला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी नावाजलेले आहे. एवढंच नव्हे तर मराठी प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटाला चांगली गर्दी केल्याचे दिसून आले. त्यानंतर हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी'मध्ये ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर हे कलाकार आहेत. हा चित्रपटही प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमांतून पुन्हा एकदा मल्टिप्लेक्स चालकांवर टीका करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in