चित्रपट परीक्षण : रोमांच उभे करणारा 'गॅसलाइट'

सस्पेन्स थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री असलेला ‘गॅसलाइट’ चित्रपट तुम्हाला काही क्षण खिळवून ठेवतो. मात्र काही ठिकाणी निराश देखील करतो.
चित्रपट परीक्षण : रोमांच उभे करणारा 'गॅसलाइट'

चित्रपट : गॅसलाईट (हिंदी)

निर्माता : रमेश ताैरानी, अक्षय पुरी

दिग्दर्शक : पवन कृपलानी

लेखन : पवन कृपलानी

कलाकार : सारा अली खान, विक्रांत मस्सी, चित्रांगदा सिंह व इतर.

शैली : हाॅरर, थ्रिलर

ओटीटी प्लॅटफाॅर्म : डिस्ने हाॅटस्टार

दर्जा : तीन स्टार

‘रागिणी एमएमएस’,‘फोबिआ’ आणि ‘डर ॲट द मॉल’ यासारख्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचे लेखन करणारे दिग्दर्शक पवन कृपलानी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गॅसलाइट’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सैफ अली खानची लेक सारा अली खान, चित्रांगदा सिंह, विक्रांत मस्सी हे नवे कलाकार या चित्रपटामधे दिसत आहेत. सस्पेन्स थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री असलेला ‘गॅसलाइट’ चित्रपट तुम्हाला काही क्षण खिळवून ठेवतो. मात्र काही ठिकाणी निराश देखील करतो.

कथानक

मीशा (सारा अली खान) ही एक अपंग मुलगी असते. मिशा तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून घरी परतते; परंतु तिचे वडील घरी नसतात. ती सर्वांना विचारते; पण तिला कुणीच काही वडिलांबद्दल सांगत नाही. मग मिशा तिच्या वडिलांचा शोध सुरू करते. शोध घेत असतानाच तिचा संशय सावत्र आई रेणुका (चित्रांगदा सिंह) हिच्यावर येतो. मिशी या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीची उकल करते. या प्रवासात ती संकटांचा कशाप्रकारे सामना करते, रहस्य उलगडते, यावर हा चित्रपट बेतला आहे.

अभिनय

हा चित्रपट मुख्यतः तीन कलाकारांभोवती फिरताना दिसतो. सिनेमासाठी कलाकारांची केलेली निवड अगदी योग्य असून, सारा अली खान ही तिच्या आत्तापर्यंतच्या सर्वांत उत्तम भूमिकांपैकी एक भूमिका साकारताना या चित्रपटामध्ये दिसत आहे. तिचा दर्जेदार अभिनय हा या चित्रपटाला खिळवून ठेवतो. तिच्या जोडीला वेबसीरिजमधून एकसोएक भूमिका वठवणारा अभिनेता विक्रांत मस्सी त्याच्या अभिनय कलेचा १०० टक्के देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यासोबतच अभिनेत्री चित्रांगदा सिंह ही तर उत्तम अभिनेत्री आहेच पण,तीची सावत्र आईच्या पात्रासाठी योग्य निवड करण्यात आली आहे.

लेखन व दिग्दर्शन

पवन कृपलानी हे अष्टपैलू भूमिकेत असून, या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, पटकथा लेखन त्यांनी केले आहे. चित्रपटात एकही गाणे नसून, केवळ बॅकग्राऊंड संगीताच्या आधारे चित्रपट पुढे जातो. त्याशिवाय मारहाण वगैरे काहीही दाखवण्यात आलेले नसल्यामुळे हा चित्रपट सहकुटुंब पाहता येईल.

चित्रपटाची कथा चांगली असली तरी, पुढे काय घडणार आहे, याचा अंदाज सुरुवातीपासूनच येत रहातो. अशा गोष्टी आपण अनेक रहस्यमयी पुस्तकांमध्ये वाचलेल्या असतात आणि क्राईम शोमध्ये पाहिलेल्या असतात. त्यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यांमधूनच संपूर्ण चित्रपटाच्या कथेचा अंदाज यायला लागतो. त्यामुळे हा सिनेमा काही दृश्यांमध्ये कंटाळवाणा वाटायला लागतो.

तुम्हाला रहस्यमय कथा, थ्रिलर चित्रपट पहायची आवड असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहू शकता. परंतु तुम्हाला काही नवीन बघायची इच्छा असेल, तर मात्र गॅसलाईट हा चित्रपट तुम्हाला निराश करेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in