सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीस अटक; यूट्यूबवर धमकीचा व्हिडीओ अपलोड केल्याचे उघड

Salman Khan Threating Case: धमकीचा व्हिडीओ अपलोड करून अज्ञात व्यक्तीने सलमानला ही धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बनवारीलाल गुजर या आरोपीस राजस्थान येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीस अटक; यूट्यूबवर धमकीचा व्हिडीओ अपलोड केल्याचे उघड

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेअभिनेता सलमान खान पुन्हा धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. धमकीचा व्हिडीओ अपलोड करून अज्ञात व्यक्तीने सलमानला ही धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बनवारीलाल गुजर या आरोपीस राजस्थान येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यांत सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बिष्णोई टोळीकडून गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने बिष्णोई टोळीशी संबंधित पाच आरोपींना अटक केली असून, या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

ही घटना ताजी असताना सलमानच्या एका मित्राला सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसला होता. 'अरे छोडो यार' या यूट्यूब चॅनेलवर एका व्यक्तीने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार त्याने सलमानला सांगितला होता. त्यानंतर त्याने दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत होते. या पथकाने आरोपीची माहिती काढून राजस्थान येथील बोर्डा गावातून बनवारीलाल गुजर या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी राजस्थान येथून मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बनवारीलालने आतापर्यंत सोशल मीडियावर दहाहून अधिक व्हिडीओ अपलोड केले असून, त्यात त्याने सलमानला धमकी देताना त्याला कशा प्रकारे मारले जाऊ शकते याबाबत खुलासा केला आहे. गावात दहशत निर्माण होण्यासाठी त्यानेच ही धमकी देताना तो बिष्णोईचा खास सहकारी असल्याचे सांगत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून, त्यात काही आक्षेपार्ह नोंदी दिसून आल्या आहेत. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in