
मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा विभक्त पती अभिनव कोहली यांनी दाखल केलेले बनावट दस्तावेज प्रकरण बंद करण्यात आले असल्याची मुंबई पोलिसांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने श्वेताला तिच्याविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी तिची याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.
श्वेताचा विभक्त पती कोहली यांनी १ मार्च २०२१ रोजी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तिने २०१७ मध्ये तिच्या अल्पवयीन मुलाच्या व्हिसासाठी ब्रिटनमधील अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी केली होती, असे कोहली यांनी तक्रारीत म्हटले होते.
श्वेताला तिच्या मुलाच्या फिजिओथेरपीसाठी यूकेमधील डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. तथापि, त्या एकट्याच प्रवास करत असल्याने (मुलाच्या वडिलांशिवाय), तिला कोहली यांच्याकडून एनओसी सादर करण्यास सांगण्यात आले. कोहली यांनी आरोप केला की, श्वेताने त्यांची बनावट स्वाक्षरी करून एनओसी मिळवली आणि मुलाला यूकेला नेले. कोहली यांनी ब्रिटनमधील दूतावासाला याबाबत कळवले.