"मी कोकणाची खिल्ली..."; कोकणी लोकांबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर मुनव्वर फारुकीने हात जोडून मागितली माफी

Munawar Faruqui on Konkani People: मुनव्वरने त्यांच्या नुकत्याच झालेल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये कोकणी लोकांबद्दल अपशब्द काढले. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
"मी कोकणाची खिल्ली..."; कोकणी लोकांबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर मुनव्वर फारुकीने हात जोडून मागितली माफी
x
Published on

Munawar Faruqui Apologizes: स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा त्याच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सोमवारी त्याने सोशल मीडियावर त्यांच्या नुकत्याच झालेल्या स्टँडअप कॉमेडी शो मधील एक व्हिडीओ शेअर केला. यावेळी त्या व्हिडीओमधून त्याने कोकणी लोकांबद्दल वादग्रस्त विधान केल्याचे दिसले. यामुळे सोशल मीडियावर बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर सगळेच भडकले.

नक्की काय म्हणाला मुनव्वर?

मुंबईत झालेल्या मुनव्वर फारुकीच्या स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये त्याने प्रेक्षकांना विचारलं की, “तुम्ही सर्वजण मुंबईतलेच आहात का? तुमच्यापैकी कोणी लांबून आलं आहे का?" तर या प्रश्नावर प्रेक्षकांतून उत्तर आलं आणि त्यावर फारुकीने विचारलं, “कुठून आलात?” त्यावर प्रेक्षकांतून उत्तर आलं की, " तळोजा?" यावर तो पुढे म्हणाला की, "तुम्ही लोकांनी मी आज विचारल तेव्हा सांगितलं की ट्रॅव्हल करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तर हे लोक सांगतात की मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना *** बनवतात.” मुनव्वरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर काही राजकीय नेत्यांनी इशाराच देताच मुनव्वर फारुकीने माफी मागितली आहे.

मुनव्वरने मागितली माफी

या संपूर्ण वादानंतर मुनव्वरने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या शब्दाबद्दल माफी मागितली आहे. मुनावर म्हणाला की, "हाय मित्रांनो , मी या व्हिडीओतून काही गोष्टी स्पष्ट करायला आलो आहे. काही काळापूर्वी एक शो केला होतो जिथे मी क्राऊड वर्क म्हणजेच लोकांशी संवाद साधत होतो. त्यावेळी कोकणाविषयी काही विषय निघाला. मला माहित होतं की तळोजामध्ये अनेक कोकणी लोक राहतात. कारण तिथे माझे अनेक मित्र राहतात. पण त्यावर मी जे बोललो ते जरा संदर्भ सोडून बोलणं झालं. लोकांना वाटलं की मी कोकणाबद्दल बोललो, त्याची खिल्ली उडवली. तर नाही मित्रांनो माझा तो हेतू मुळीच नव्हता. मी आत्ताही तेच सांगतो की क्राऊड वर्कमध्ये मी बोलून गेलो. पण मी आता बघितलं की माझ्या या बोलण्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मी स्टँडअप कॉमेडियन म्हणून जे माझं काम आहे लोकांना हसवणं ते मला करायचं आहे. त्यामुळे मी लोकांना दुखवणं इच्छित नाही. त्यामुळे मी मनापासून जे दुखावले गेलेत त्यांची माफी मागतो. सॉरी माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. मी ज्यांच्यावर जोक केला त्यांनी पण तो जोक एन्जॉय केला होता. मराठी, हिंदू, मुस्लिम सगळेच लोक होतो. पण इंटरनेटवर जोक व्हायरल झाल्यावर मला गोष्टी समजल्या. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र” असं म्हणत मुनव्वरने माफी मागितली आहे.

याआधी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा होता आरोप

मुनव्वर फारुकी याआधीही वादात सापडला होता. १ जानेवारी २०२१ रोजी तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका कॅफेमध्ये स्टँडअप शो करत असताना भाजप आमदार मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर याने त्याला शो करण्यापासून रोखले आणि हिंदू देवतांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. भारतात द्वेष पसरवण्याच्या गुन्ह्याखाली त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in